जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:49 PM2020-01-12T23:49:07+5:302020-01-13T00:56:14+5:30
मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मोबाइल आणि भरजरी कपडे या गोष्टींना महत्त्व आल्याने आंतरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संस्कृती नष्ट होत चालली आहे, असे प्रतिपादन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
नाशिक : मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मोबाइल आणि भरजरी कपडे या गोष्टींना महत्त्व आल्याने आंतरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संस्कृती नष्ट होत चालली आहे, असे प्रतिपादन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. रविवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजता पुण्यप्रकाश, राका कॉलनी, शरणपूररोड येथे ‘सफलता के सही मायने’ या विषयावर महाराज बोलत होते.
दरम्यान, जैन साधू-संतांच्या आगमनानिमित्त शहरातील कॉलेजरोड येथून कॅनडा कॉर्नरमार्गे शरणपूररोडवरील राका कॉलनीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
आचार्य रत्नसुंदर सुरी यांचे ‘सफलता के सही मायने’ या विषयावर सुमारे दीड तासाचे प्रवचन झाले. यावेळी महाराज म्हणाले की, जीवनात काही पाहिजे हे बरोबर आहे, पण फळाची अपेक्षा करू नका, संसारात तुम्ही राहता पण जीवनात आनंदी ठेवणारी एकतरी गोष्ट शाश्वत आहे काय? पूर्वीच्या काळात स्वत:चे वजन होते ते आता कागदावर आले, असे सांगून महाराज म्हणाले की, आज तुम्ही सुखी आहात का? जीवनात प्राप्ती आणि त्यानंतर तृप्ती या दोन्हींपैकी कशात सुख आहे हे आपण सांगावे पवित्रता, सुख, सफलता, विजय, सिद्धी हे जीवनाचे अंग आहेत, त्यामुळे याचा उपयोग निश्चितपणे करणे गरजेचे आहे. जीवनात काय मिळविले आणि माझ्याकडून काय गेलं याचा विचारदेखील आपण केला पाहिजे. राजन पारीख यांनी स्वागत केले.
यावेळी राजेंद्र शहा, विलास शहा, प्रवीण जैन, शरद शहा, महेश शहा, गौतम सुराणा, डॉ. शैलेश शहा, सुंदर शहा, सुनील शहा यांच्यासह हजारो जैन बांधव उपस्थित होते. उद्या सोमवारी (दि. १३) सकाळी ९.१५ वाजता ‘संबंधो का टॉप सिक्रेट’ विषयावर प्रवचन होणार आहे.
आचार्य रत्नसुंदर सुरींच्या प्रवचनातील बोल
मला दीक्षा घेण्यास ५३ वर्ष झाली असून आजही आनंदी आहे.
४आपण दर रविवारी मनोरंजन करताना कधी पांजरापोळ, गोशाळा, हॉस्पिटलला भेट दिली का? एखाद्या गरिबाला उपयोगी पडण्याची इच्छा झाली काय?
४ब्रॅँडेड कपडे पाहिजे म्हणतो पण आपण ब्रॅँडेड आहात का? असे महाराज यावेळी म्हणाले.
मिरवणुकीचे स्वागत
आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज, आचार्य पद्मसुंदर सुरीजी महाराज आणि जैन साधू-संत यांच्या नाशिक शहरातील आगमनानिमित्त सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. कॉलेज रोडवरील शेखरभाई सराफ यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत महिलांच्या डोक्यावर कलश होते. तसेच यानिमित्त रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत वाद्य पथक, नृत्य पथक, सफेद वस्त्र परिधान केलेले नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक कॅनडा कॉर्नर, शरणपूर मार्गे राका कॉलनी येथे आली.