मधुमेहींना कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:09 AM2019-11-17T00:09:30+5:302019-11-17T00:10:18+5:30
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रथम आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज आवश्यक असायला हवी. निदान झाल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असून, उपचारादरम्यान संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे असते.
नाशिक : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रथम आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज आवश्यक असायला हवी. निदान झाल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असून, उपचारादरम्यान संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे असते. मधुमेही रुग्ण ज्याठिकाणी काम करत असेल, त्या ठिकाणच्या सहकाऱ्यांचा सहवासदेखील मधुमेह निवारणाला फायदेशीर ठरतो. मधुमेह हा अतिशय संथरीत्या बळावत जाणारा आजार असल्याने त्याचे निदान वेळीच होणे आवश्यक असल्याचा सूर आरोग्यमंथन या कार्यक्रमात ‘मधुमेह व कुटंब’ या विषयावर परिसंवादातून तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.
रोटरीक्लब आॅफ नाशिकतर्फे आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी दर महिन्याला घेण्यात येणाºया आरोग्यमंथन परिसंवादात गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास सभागृहात ‘मधुमेह व कुटुंब’ या विषयावर चर्चा करण्यात आली. आहारात फास्ट फूडचा वापर, अतिआहार, व्यायामाचा अभाव, ही कारणे प्रकर्षाणे जाणवत असल्याने व्यायाम, संतुलित आहार, नियमबद्ध जीवनशैली यावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावेळी मधुमेह तज्ज्ञ डॉ. अजित कुमठेकर, डॉ. मृणाल केळकर, राष्टय मेडिकल असोसिएनचे डॉ. राजेंद्र नेहते, आहारतज्ज्ञ डॉ. रश्मी सोमाणी मंचावर होते. डॉ. रचना चिंधडे यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडित प्रश्न तज्ज्ञांना विचारले. प्रश्नोत्तरातून हा परिसंवाद अधिकाधिक खुलत गेला. त्यावेळी तज्ज्ञांनी मधुमेहाचे निदान झाल्यानंतर उपचारपद्धतीत सुसूत्रता ठेवण्यासाठी कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष चिंधडे उपस्थित होते.
व्यायामाची गरज
मधुमेह या आजाराची समस्या वैयक्तिक नसून सामाजिक आहे. गेल्या काही वर्षांत धूम्रपान, तंबाखू सेवन आणि ध्वनी व वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्येत वाढ होत आहे. सध्या ८ टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त असून, दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे. देशाचा क्र मांक मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दुसरा असून, मधुमेह टाळण्यासाठी रोज किमान दहा हजार पावले चालणे गरजेचे आहे. तसेच नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला यावेळी तज्ज्ञांनी दिला.