भारतात भारतीय ज्ञानच देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 01:43 AM2019-12-16T01:43:46+5:302019-12-16T01:44:11+5:30
भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुनर्उत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू इंदुमती काटदरे यांनी केले.
नाशिक : भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुनर्उत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू इंदुमती काटदरे यांनी केले.
भारतीय इतिहास संकलन समिती, नाशिक व वैदिक शिल्प शोध प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) रुंग्टा हायस्कूल येथे कृष्णाजी विनायक वझे यांच्या १५०व्या स्मृतिदिनानिमित्त ‘गौरव ग्रंथ : भाग १’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून काटदरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या. तसेच भारताला लवकरात लवकर प्रगती करायची असेल तर आपल्या भारताचा प्राचीन इतिहास समोर आणलाच पाहिजे.
आपले प्राचीन विचार हे अजरामर असून, कोणताही देश याची बरोबरी करू शकत नाही. आपले लोक याला त्याला पुरून उरण्याची भाषा करत असतात. मात्र आपल्या विचारांनी लोकांवर पुरून उरण्याची भाषा आपण करणे आवश्यक आहे. यामुळे इतर देशांना आपले महत्त्व कळेल, असे त्यांनी सांगितले.
या ग्रंथांचे संपादन मोहिनी पेणेकर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधक ओमप्रकाश कुलकर्णी हे होते. यावेळी इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भामसे, आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते, जयंत गायधनी, विजयप्रसाद उपाध्याय आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर यांनी तर आभार देवेंद्र पंड्या यांनी मानले.