इंटरनेटच्या वापरावर स्वयंनिर्बंध घालण्याची गरज; इंटरनेटतज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 02:00 PM2020-10-29T14:00:58+5:302020-10-29T14:05:37+5:30
नाशिक- अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकीच इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. लाॅकडाऊनमध्ये तर त्याचे महत्व अधिक अधोरेखीत झाले आहे. मात्र, इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आजार आणि मानवी स्वभावातील बदल तर आहेच परंतु त्यातून मनुष्यबळाच्या उत्पादकतेवर देखील प्रतिकुल परीणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंटरनेट हे दुधारी शस्त्र बनले आहेत, त्याचा वापर स्वयंशिस्त आणि स्वयनिर्बंधातून करावा असे मत इंटरनेट तज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांनी व्यक्त केले.
नाशिक- अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकीच इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. लाॅकडाऊनमध्ये तर त्याचे महत्व अधिक अधोरेखीत झाले आहे. मात्र, इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आजार आणि मानवी स्वभावातील बदल तर आहेच परंतु त्यातून मनुष्यबळाच्या उत्पादकतेवर देखील प्रतिकुल परीणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंटरनेट हे दुधारी शस्त्र बनले आहेत, त्याचा वापर स्वयंशिस्त आणि स्वयनिर्बंधातून करावा असे मत इंटरनेट तज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांनी व्यक्त केले.
आज जागतिक इंटरनेट डे आहे. अमेरिकेत २९ ऑक्टेाबर १९६९ रोजी ऑक्टोबर रोजी चार्ली क्लाईन या विद्यार्थ्याने पहिला इलेक्ट्रॉनिक मॅसेज पाठवला. त्याने पाठवलेली लॉगीन हा मॅसेज पुर्णत: पोहोचला नाही तर अवघी दोन अक्षरे पोहोचली. परंतु तरीही या घटनेची स्मृती जपण्यासाठी दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी जागतिक इंटरनेट डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने इंटरनेट तज्ज्ञ भाग्यश्री केंगे यांच्याशी साधलेला संवाद..
प्रश्न- इंटरनेटचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे, त्याविषयी काय सांगाल?
केंगे- इंटरनेटचे महत्व होतेच, परंतु आता सेाशल मिडीयाचा आधार म्हणून तो वाढत गेला. लॉकडाऊनमध्ये तर इंटरनेटचे महत्व अधिकच वाढले. बँकेसह सर्व ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन ऑफीस आणि ऑनलाईन शिक्षण यामुळे इंटरनेट खूपच उपयुक्त ठरल्याचे दिसले. मुलांचे शिक्षण अशाप्रकारे झाल्याने त्यांना प्रथमच पालकांनी त्यांना मोबाईल स्वत:हून दिला. इंटरनेट किती प्रकारे उपयुक्त ठरू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात इंटरनेटचा वापर कैकपटीने वाढल्याचे दिसले.
प्रश्न- इंटरनेटच्या अतिवापरामुळे काही दुष्परीणाम देखील झाले..
केंगे- होय. इंटरनेटचा वापर हे सुयोग्य असले तरी अती वापर झाल्याने दुधारी शस्त्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. विशेषत इंटरनेटमुळे सोशल मिडीयावर तास न तास राहणारे नागरीक तयार झाले. सोशल मिडीयावर एखाद्याने चॅलेंज केले तर त्याला प्रतिसाद देण्याची एक इर्षा निर्माण झाली. मुलांचाही अतिवापर वाढला. जे आई वडील मुलांना मोबाईल हातात देत नव्हते त्यांनीच मुलांच्या हाती मोबाईल सोपवले. ज्येष्ठ नागरीकांकडे भरपूर मोकळा वेळ असल्याने ते देखील खूपच इंटरनेट वापर करीत असल्याचे आढळले. नोकरदारांनी वर्क फ्रॉम हेाम केले मात्र ते करताना दुसरी साईट किंवा सोशल मिडीयाचा वापर देखील झाला. अशावेळी काम करताना प्रॉडक्टीव्हीटीवर प्रतिकुल परीणाम झाल्याचे देखील आढळले. त्यामुळे एकंदरच इंटरनेटमुळेच व्याया होणारा वेळ, स्वभावातील बदल आणि शारिरीक विकार अशा प्रकारचे दुष्परीणाम आढळले आहेत.
प्रश्न- इंटरनेटचा वापर खूपच वाढतो आहे, त्यावर काही मर्यादा घालता येईल का?
केंगे- इंटरनेटचा अमर्याद वापर कुठे तरी थांबायला हवा. वेळ घालवण्यासाठी सेाशल मिडीयाचा वापर करताना दुसरीकडे मात्र, त्याचा गरज नसताना केला जाणारा वापर अधिक आहे. त्यामुळे इंटरनेटच्या वापरावर स्वयंनिर्बंध हवेत.
मुलाखत - संजय पाठक