चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे -बाळासाहेब थोरात
By admin | Published: February 9, 2015 02:08 AM2015-02-09T02:08:44+5:302015-02-09T02:09:15+5:30
चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे -बाळासाहेब थोरात
नाशिक : पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकांत बराच फरक पडला आहे. निवडणुकीची आताची पद्धत पाहिल्यावर लोकशाहीचे पुढे कसे होईल, उमेदवारी करावी की नाही, असा प्रश्न पडतो. निवडणुकांतील वाढता खर्च हा काळजीचा विषय झाला असून, याबाबत चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार स्वीकारल्यानंतर थोरात बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते. थोरात यांच्या पत्नी कांचन, पुरस्कार निवड समितीचे जयप्रकाश छाजेड, वंदन पोतनीस, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे, कार्याध्यक्ष प्रा. विनया केळकर, देणगीदार डॉ. शोभा नेर्लीकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमात बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते बाळासाहेब थोरात यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पन्नास हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले की, हा पुरस्कार हा आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा सन्मान आहे. कौतुकामुळे उमेद वाढते. संगमनेरच्या जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वयाच्या तिशीतच मिळाली. वडील भाऊसाहेब यांनी पाया तयार करून ठेवला होता. लोकप्रतिनिधीसाठी त्याचा मतदारसंघ सर्वांत महत्त्वाचा असतो. नियोजन, प्रामाणिकपणा व सातत्य यामुळेच यश मिळू शकले. काम केले नाही असा एकही दिवस गेला नाही. पाटबंधारे, शिक्षण, कृषी, महसूल अशा सर्व खात्यांत काम करण्याच्या संधीचे चीज केले. विरोधक, पक्षांतर्गत विरोधक, लोकांच्या अपेक्षा, कामांचे दडपण, प्रतिमेची जपणूक अशा अनेक आघाड्यांवर आमदाराला लढावे लागते. महाराष्ट्रात अनेक आमदार चांगले काम करीत आहेत. त्यांना सन्मानित केल्यास त्यांची उमेद वाढेल. नाशिक जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत एकत्र येऊन, चर्चा करून मार्ग काढावा लागेल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची केली स्तुती
आमदार बाळासाहेब थोरात यांनी गतवर्षीचे कार्यक्षम आमदार पुरस्कारविजेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. फडणवीस यांना विधानसभेतील कामकाजाचा फायदा झाल्याचे सांगत त्यांना लोकांच्या प्रश्नांची चांगली जाण असून, ते प्रश्नांची चांगली मांडणी करीत असल्याचेही ते म्हणाले.
जयप्रकाश छाजेड, वंदन पोतनीस यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. औरंगाबादकर यांनी प्रास्ताविक केले. सावानाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, प्रा. विनया केळकर यांनी परिचय करून दिला. दिनेश गायधनी, देवांग जोशी, विजय पाठक यांनी पुरस्कार वितरणापूर्वी वेदमंत्राचा उद्घोष केला. नरेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले. आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, विनायकदादा पाटील, माधवराव पाटील, रावसाहेब कसबे, गुरुमित बग्गा, राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)