मनाची मशागत हवी !
By किरण अग्रवाल | Published: April 1, 2018 08:56 AM2018-04-01T08:56:04+5:302018-04-01T08:56:04+5:30
अंधश्रद्धांना अटकाव करण्यासाठी कायदा करण्यात आल्यानंतर चमत्काराच्या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्या अनेकांची दुकाने खालसा झाली; परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी विज्ञान व विवेकवाद्यांना अजूनही मोठा वाव असल्याचे अलीकडील काही घटनांवरून दिसून यावे. त्र्यंबकेश्वरमधील कुण्या कलकीराम महाराजाच्या भक्तांनी आपल्या महाराजाकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून जगभरातील सर्वधर्मीय पवित्रस्थानांवर एकाचवेळी पाण्याने दिवे प्रज्वलित करण्याचा दावा केला आहे. विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध न होऊ शकणाºया अशा बाबी अंधश्रद्धा वाढविण्यास कारणीभूत ठरणाºया असून, या भक्तांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कार करून दाखविण्याचे आव्हानही दिले आहे. परंतु ते होत असताना भोळ्या-भाबड्या जनतेस मूर्खात काढू पाहणाºया अशा घटकांना कायद्याने लगाम घातला जाणेही गरजेचे आहे. यासंबंधीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांनी भंबेरी उडालेल्या भक्तांचा त्यांच्या महाराजांशी संपर्क होऊ न शकल्याने ती पत्रकार परिषद गुंडाळली गेली; परंतु त्यांचा कथित व नियोजित चमत्कार विज्ञानाला आव्हान देणाराच असल्याने सार्वजनिक पातळीवर अनेकांचा वेळ खर्ची पडण्यापूर्वी त्यासंबंधीचा सोक्षमोक्ष होण्याची अपेक्षा गैर ठरू नये. अशा प्रवृत्ती प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे ओढवून घेत, अशिक्षित-अज्ञानी लोकांना जाळ्यात खेचतात असा नेहमीचा अनुभव आहे. तेव्हा, तसे घडून येण्यापूर्वीच बंदोबस्त व्हायला हवा. एकीकडे अवैज्ञानिक चमत्काराचा हा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे लहवित गावातील काही घरांवर दगडफेक झाल्याने त्याबद्दल प्रारंभी भुताटकीचा संशय घेतला गेला. पोलिसांनी याबाबत लागलीच तेथे धाव घेऊन ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करीत, दगडफेक करणाºयास पकडण्याची भाषा केल्याबरोबर हा प्रकार दोन-चार दिवस थांबला; परंतु पुन्हा तोच प्रकार सुरू झाल्याने काहींनी भयापोटी घरातील मंडळीस बाहेरगावी पाठविले आहे. या प्रकारामागे कुणी माथेफिरू असण्याचीच शक्यता व संशय आहे, त्याला हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर असले तरी सदरचा प्रकारही उगाच अंधश्रद्धीय चर्चांना निमंत्रण देणारा ठरला आहे. मागेही सुरगाणा तालुक्यात एका आदिवासी गावात कुणाच्या तरी अंगात येते व तो गावातील जनावरे खातो अशी आवई उठवून दिली गेली होती व त्यातून सदर इसमाचा संशयास्पद मृत्यू घडून आला होता. याप्रकरणातील व्यक्तीच्या सुशिक्षित नातवानेच यासंदर्भात लढा देत अंधश्रद्धा दूर करण्याची भूमिका घेतली होती. पुण्यातील प्रख्यात रुग्णालयात मांत्रिकाकडून उपचार केल्याची जी घटना अलीकडेच समोर आली तसलाच प्रकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातही काही महिन्यांपूर्वी घडला होता. अन्यही अशी अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. तेव्हा, एकूणच समाजातील अंधश्रद्धीय समजांची जळमटे दूर झालेली नसल्याचेच या घटनांतून दिसून येणारे असून, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांसमवेतच विज्ञानवादी व सुजाण नागरिकांनी यासंदर्भात अशिक्षितांच्या मनाची मशागत करण्याची गरज आहे. केवळ कायदे करून अंधश्रद्धा घालवता येणार नाही, तर समाजातील जाणत्यांनाच त्यासाठी जागरणाचा पुढाकार घ्यावा लागेल.