कोरोना विरूध्द राजकारणविरहीत लढा देण्याची गरज !
By संजय पाठक | Published: April 8, 2021 05:05 PM2021-04-08T17:05:21+5:302021-04-08T17:11:50+5:30
नाशिक- कोरोना काळात लढताना प्रशासकीय यंत्रणा थकल्या असतानाच जणू दुसरी लाट आल्याचे भासत आहे. बेड मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई, रेमडिसीवरचा काळाबाजार अशी गंभीर स्थितीत खरे तर आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही महापालिकेत सत्ता कोणाची हे बघून आरोप प्रत्याराेप हेात असतील, हे राजकीय शहाणपण नाही असे म्हणावे लागेल.

महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे राजकारण होणे अपेक्षीत आहे परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि महापालिकेत भाजपची सत्ता यामुळे कोणत्याही त्रूटी आणि उणिवा शाेधून राजकारण करणे आलेच. शिवसेना त्यातून आरोप प्रत्यारोप करते तर कधी मनसे प्रश्न उपस्थित करते असे बहुतांश जाणवतच आहे. गुरूवारीही शिवसेनेच्या ज्येेष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी नाशिकरोड येथील बिटकेा रूग्णालयात सुविधा नाहीत म्हणून आंदोलने केले.
खरे तर कोरोना हा विषय एकट्या महापौर सतीश कुलकर्णी किंवा भाजपा अथवा प्रशासनाचा नाही. तसेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने त्यांचाच हा विषय आहे असे नाही अनेक यंत्रणा, खासगी रूग्णालय, आरोग्य क्षेत्राला पुरक उद्याेग त्यांच्याकडून होणारा पुरवठा असा एकात एक गुंतलेला विषय आहे. त्यामुळे कोरेाना सारख्या आपत्तीला एकत्रीत सामोरे जाणे आवश्यक आहे. तसे हेाताना दिसत नाही.महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांना कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही अशी विरोधकांनी टीका करायची आणि राज्याकडून मदत मिळत नाही म्हणून भाजपानेशिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करायची असा हा प्रकार सुरू आहे.
शहरातील नागरीकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना उणिवा शोधण्यात नव्हे तर आता संकट काळात आधार देणाऱ्यांची गरज आहे. आता एकेका घरात अनेक जण बाधीत असल्याने त्यांना बेड तर मिळत नाहीच शिवाय अन्य अनेक अडचणी उभ्या आहेत. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा अशा नागरीकांना मदत करणे हे महत्वाचे आहे. मग भलेही त्याचा वापर श्रेयासाठी झाला तरी चालेल. वादापेक्षा हे परवडले अशी स्थिती आहे.