जमिनी वाचविण्यासाठी रणसंग्रामाची गरज
By admin | Published: May 28, 2015 12:01 AM2015-05-28T00:01:09+5:302015-05-28T00:07:19+5:30
राजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा; लढ्यात शेतकऱ्यांसोबत राहण्याची ग्वाही
सिन्नर/पांगरी : इतक्या दिवस जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लढाई एकाकी होती. यापुढे या लढाईत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या सोबत राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. उद्योगपतींच्या घशात जमिनी जाऊ नये, यासाठी आगामी काळात मोठा रणसंग्राम उभा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे बुधवारी सकाळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
जमीन अधिग्रहण कायद्यात शेतकऱ्यांना खलनायक समजणे चुकीचे आहे. उद्योगपती व धनदांडग्यांना जमिनी देण्यासाठी कायदा करणार असाल तर त्याला आपला विरोध असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनी घेणार असाल तर या कायद्याला आपण लोकसभेत पहिला विरोध नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनी मिळाल्या नाही तर विकास कसा होणार, असे विचारणाऱ्यांना शेट्टी यांनी चांगलेच फटकारले.
शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांची संमती व बाजारभावाप्रमाणे मूल्य देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय दराने एकप्रकारे फुकटात घेऊन पाहणाऱ्यांना आपला विरोध राहील असे त्यांनी निक्षून सांगितले.
बीओटी तत्त्वावर रस्ते बांधताना भुजबळांनी शेतकऱ्यांना टोलमध्ये हिस्सा का दिला नाही, असा सवालही शेट्टी यांनी विचारला. सिन्नर तालुक्यात इंडिया बुल्सच्या रेल्वेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना कंपनीच्या दरवर्षीच्या उत्पन्नाचा काही भाग शेतकऱ्यांना द्या म्हणजे त्यावर विचार करता येईल, असे ते म्हणाले. विकासाला आपला व संघटनेचा विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांचे थडगे बांधून विकासाचे मनोरे बांधणार असाल तर तुमचे थडगे बांधू, असा सज्जड दम शेट्टी यांनी यावेळी भरला.
यापुढे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी पाहिजे असल्यास त्या शेतकऱ्यांची संमती पाहिजे व बाजारभावाच्या किमान पाचपट किंमत त्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असा निर्णय नव्या सरकारने संघटनेच्या दबावामुळे घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशात दूध उत्पादन वाढले या संधीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा सुरू असून, दूध दराबाबतीत लढा उभारणार असल्याचे शेट्टी म्हणाले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी मदत करेल ही गुरुदक्षिणा आपल्याला द्या, असे शेट्टी म्हणाले. सभेच्या शेवटी शेट्टी यांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित राहण्याची शपथ दिली.
केंद्र आणि राज्य सरकार बदलल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले. जनावरांत दलाली कमी मिळते व जमिनीच्या व्यवहारात जास्त मिळते. त्यामुळे आमदार व खासदार उद्योजकांचे दलाल झाल्याचा आरोप खोत यांनी केला. शासनाने पूर्वीच्या घेतलेल्या जमिनी अगोदर विकसित कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. उद्योजक बनवायचे असेल तर देशातल्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना बनवा, असे आवाहन खोत यांनी केले. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविणाण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांनी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या औद्योगिकीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनी परत करून दाखवाव्यात, असे आव्हान खोत यांनी दिले. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘दुष्काळ दिलासा यात्रा’ काढल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, प्रवक्ता योगेश पांडे, हंसराज वडघुले, जालिंदर पाटील, गोविंद पगार, दीपक पगार, सिन्नर तालुका अध्यक्ष रवींद्र पगार, गोपीनाथ झाल्टे, रतन मटाले, कैलास वाणी, रमेश पांगारकर, विलास पांगारकर, रभाजी पगार आदिंसह मान्यवर उपस्थित होते. आत्माराम पगार, मच्छिंद्र चिने, भाऊसाहेब पगार, बाळासाहेब सापनर, शांताराम पगार, बाळासाहेब पगार यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)