इतिहासाच्या पुनर्मांडणीची गरज उत्पात : मोहिनीराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:18 AM2017-12-18T01:18:38+5:302017-12-18T01:19:48+5:30
भारताचा इतिहास गौरवशाली आणि शूरवीरांचा आहे. मात्र, इंग्रजांनी या देशावर अंमल प्रस्थापित करताना दुहीची बीजे पेरत चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली, असा आरोप पंढरपूर येथील भागवताचार्य वासुदेव उत्पात यांनी केला.
नाशिक : भारताचा इतिहास गौरवशाली आणि शूरवीरांचा आहे. मात्र, इंग्रजांनी या देशावर अंमल प्रस्थापित करताना दुहीची बीजे पेरत चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली, असा आरोप पंढरपूर येथील भागवताचार्य वासुदेव उत्पात यांनी केला. नव्या पिढीला खरा इतिहास कळला पाहिजे त्यासाठी इतिहासाच्या पुनर्मांडणीची गरजही त्यांनी व्यक्त केली.
श्री मोहिनीराज भक्त मंडळाच्या नाशिक शाखेच्या वतीने येथील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित जीवन गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा श्री मोहिनीराज जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. भारताच्या गौरवशाली इतिहासाचे विवेचन करताना उत्पात यांनी अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, जगाला अभिमान वाटावा, असा भारताचा इतिहास आहे. इतिहासाची पुन्हा एकदा नव्याने मांडणी होणे गरजेच आहे. तरुण पिढीपुढे देशाचा खरा इतिहास आला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी भागवताचार्य उत्पात यांच्या हस्ते रामचंद्र धर्माधिकारी, दिगंबर कुलकर्णी, वासुदेव कुलकर्णी, दामोदर गर्गे, सुमन गायधनी, नारायण गायधनी, शकुंतला चंद्रात्रे, विद्या मोहोळे, पुष्पा देव, नलिनी झेंडे, वसंत गर्गे, निर्मला गायधनी, रामचंद्र जोशी, प्रभावती गायधनी, वसंत गायधनी आदींना शाल व स्मृतिचिन्ह देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष किशोर गायधनी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विश्वस्त यादवराव शुक्ल, महिला अध्यक्ष चित्रा देव, दत्तात्रय गायधनी, विनायकराव शुक्ल, विजय डोंगरे, रमेश देव, सुनीता गायधनी, सुवर्णा कुलकर्णी आदींसह श्री मोहिनीराज भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सावरकरांचे स्मारक व्हावे..
वारकरी पंढरपूरची वारी करतात, तशी मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाशिकची वारी करतो, असे सांगून उत्पात यांनी जाज्वल्य राष्टÑभक्त असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्टÑीय स्मारक झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.