नद्याचे प्रदूषण दूर करण्याची आवश्यकता : शिंदे
By admin | Published: February 23, 2017 12:02 AM2017-02-23T00:02:09+5:302017-02-23T00:02:45+5:30
नद्याचे प्रदूषण दूर करण्याची आवश्यकता : शिंदे
देवळाली कॅम्प : देशाला खऱ्या अर्थाने सुजलाम् व सुफलाम् करण्यासाठी गो-संवर्धनासह गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा यांसारख्या नद्यांचे प्रदूषण दूर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वारकरी शिक्षण संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू हभप संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर) यांनी केले. लहवित येथील वाडीचा मळा येथील भैरवनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (आळंदी) शताब्दी महोत्सव व संगीत गाथा पारायण सोहळ्याच्या समारोपप्रसंगी हभप संदीपान महाराज शिंदे यांनी ‘गोड लागे परी सांगताची न ये, बैसे माझी अंगे हरपली’ या भगवान श्रीकृष्णाचे वर्णन करणाऱ्या गौळणीवर आधारित भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वर्णन व आजच्या समाजाला गरज असणाऱ्या तत्त्वचिंतनावर काल्याचे कीर्तन केले.
यावेळी सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या चरण पादुकांची महामंडलेश्वर जगद्गुरू विठ्ठलनाथ द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, श्रीश्री महामंडलेश्वर दासजी, स्वामी कृष्णचैतन्य स्वामी, गणेशगिरी रामकृष्ण महाराज ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव, खासदार हेमंत गोडसे यांसह विविध साधू-महंत यांच्या उपस्थितीत शाहीस्नान घालण्यात आले. गाथा पारायण सप्ताहात नंदकिशोर महाराज वाघमारे, समाधान महाराज पाटील, मनोहर महाराज सायखेडे आदिंनी संगीत पारायण सांगितल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)