पुस्तक चळवळ उभारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:21 AM2019-11-02T01:21:16+5:302019-11-02T01:21:50+5:30
मुलांना ऐकू व बोलू देणाऱ्या बाल शाळा असेल तर बालकांचा विकास झपाट्याने होतो. त्यासोबतच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तकांची गोडीही निर्माण होण्याची गरज असते.
नाशिक : मुलांना ऐकू व बोलू देणाऱ्या बाल शाळा असेल तर बालकांचा विकास झपाट्याने होतो. त्यासोबतच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तकांची गोडीही निर्माण होण्याची गरज असते. त्यासाठी जिथे मुले तिथे पुस्तक अशी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ सुचिता पडळकर यांनी केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या फुलोरा शाळेत मुलांना विविध अनुभव देऊन प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची प्रक्रियाही उलगडून सांगितली.
नाशिकमधील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेतर्फे शुक्रवारी (दि.१) बालशिक्षण परिषद व २६ व्या वार्षिक अधिवेशनाची सुरुवात झाली. ‘बाल विकासासाठी आम्ही’ विषयावर होणाºया परिषदेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी सुचिता पडळकर यांच्या हस्ते अंबर चरख्यावर सूत कातून परिषदेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्ष अलकाताई बियाणी, संस्थापक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, दिनेश नेते, डॉ. बाळकृष्ण बोकील उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिन जोशी यांनी केले. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या सचिव मेघना भाकरे यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन स्वाती गद्रे यांनी केले. परिषदेच्या नाशिक केंद्राचे अध्यक्ष शांताराम बडगुजर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान, परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बाळकृष्ण बोकील यांचे ज्ञानांकुर हे आॅडिओ बुक, सुषमा पाध्ये यांचे भाषेच्या कविता व केदार नाईक यांचे कलेचे विश्व या तीन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.