जमीन व्यवहारात कायद्याचा अभ्यास गरजेचा
By Admin | Published: December 9, 2015 11:45 PM2015-12-09T23:45:08+5:302015-12-09T23:45:48+5:30
रिअल्टर्स डे : ‘एआरसी’च्या परिसंवादात उमटला सूर
नाशिक : जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून फसवणूक टाळता येणे शक्य होईल. तसेच जमिनीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांनी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या कायद्याचा सखोल अभ्यास ठेवणे काळाची गरज असल्याचा सूर परिसंवादात उमटला.
सोशल वेल्फेअर असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट कन्सल्टंट (एआरसी) यांच्यातर्फे संध्याकाळी महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘सातबारा रिअल्टर्स डे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अजित मराठे, कायदेतज्ज्ञ एम. डी. कुलकर्णी, नॅशनल असोसिएशन आॅफ इंडियाचे पश्चिमप्रमुख विनोद ठक्कर, रवि वर्मा, अॅड. नीळकंठ अहेर, जय पटेल, सुजॉय गुप्ता, प्रवीण फणसे आदि उपस्थित होते.
कुळकायदा, रीत, भोगवटा, जमीन कमाल धारणा कायदा, तळेगाव दाभाडे योजना, वारसा हक्क, स्त्रियांचे हक्क व अधिकार, आदिवासी जमीन विषयक कायदा, घटनात्मक निवाडे आदिंबाबत कुलकर्णी यांनी माहिती दिली. तसेच ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी जमिनीविषयक व्यवहार करणाऱ्यांना ‘दलाल’ असे म्हटले जात होते; मात्र काळानुरूप हा शब्दप्रयोग बदलला असून, ब्रोकर, रिअल्टर्स असे शब्दप्रयोग वापरले जात आहेत. त्यामुळे या व्यवसायातील लोकांना आगळा नावलौकिक प्राप्त होऊ लागला आहे. रिअल्टर्सकडून समाजात संबंध अधिकाधिक प्रस्थापित करून पारदर्शक व्यवहारावर भर दिल्यास त्यांच्यावरील जनमानसाचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असे वर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित रिअल्टर्सकडून विविध प्रश्नांच्या माध्यमातून शंकांचे निरसन करून घेण्यात आले. सूत्रसंचालन सुमित्रा महाजन यांनी केले.