गरज सर्वंकष वाहतूक उपाययोजनांची

By admin | Published: April 6, 2017 01:56 AM2017-04-06T01:56:24+5:302017-04-06T01:56:38+5:30

नाशिक : वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात.

The need for universal transport measures | गरज सर्वंकष वाहतूक उपाययोजनांची

गरज सर्वंकष वाहतूक उपाययोजनांची

Next

 नाशिक : शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या कॉलेजरोड आणि गंगापूररोडवरील वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली किंवा एखादा गंभीर अपघात घडला की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात. परंतु येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची गरज आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांसारख्या यंत्रणा या कितपत गांभीर्याने घेतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.कॉलेजरोड आणि गंगापूररोड हा उच्चभ्रू परिसर मानला गेला असला तरी येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या वाहतूक समस्यांना तोंड द्यावे लागते. या मार्गावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांमुळे भरधाव दुचाकी चालविणारे बाइकर्स तसेच कसरती करणारे स्टंट मॅन यामुळे येथे चालणे तसे धोकादायकच असते. आपण कितीही नियमानुसार वाहन चालवा, परंतु आपल्या पाठीमागून किंवा समोरून येणारे नियमांचे पालन करीत येईल याची खात्री नसते त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचे अनेक अपघात झाल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. पोलीस यंत्रणेकडून त्यावर उपाय करण्याचे दाखविण्यासाठी कधीतरी दुचाकी अडविण्यासारखे प्रकार घडतात. परंतु एक- दोन दिवसांच्या अशा कारवाईने तात्पुरती मलमपट्टी होते. गेल्यावर्षी अशाच प्रकारे एका प्राध्यापकाला अपघातामुळे जीव गमवावा लागल्यानंतर महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक वाहतुकीच्या बेशिस्तीविरोधात संयमाने पुढे सरकले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही.
या मार्गांवर वाहनांसाठी पुरेशी जागा न सोडता बांधलेल्या इमारती आणि व्यापारी संकुले ही समस्या आहेच, परंतु त्यापलीकडे जाऊन रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे हीदेखील वाहतुकीला अडथळा ठरतात. फळविक्रेते, अंडारोल, पाणीपुरी यांसह अनेक विक्रेत्यांची अतिक्रमणे थाटली असून, ती हटविण्याची मात्र कोणतीही कारवाई महापालिका करीत नाही. गंगापूररोडवर किमान रस्ता रुंद आहेत. कॉलेजरोडवर मात्र तशी सोय नाही. दुभाजकांमुळे अगोदरच रस्ते अरुंद आहेत त्यातच दुतर्फा रस्ता रुंदीकरणाची सोय नाही. उलट दोन्ही बाजूच्या दुकाने, शोरूमचे वाहनतळ म्हणजे रस्तेच ठरले आहेत. विशेष म्हणजे अनेक शोरूमचे संचालक कॉलेजरोडच्या शोरूमसमोर प्रशस्त वाहनतळ अशी प्रसिद्धी करीत असतात.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई करणे हा उपाय नाही तर अशा इमारतींची वाहनतळे शोधून तेथे वाहने कशी उभी राहतील, याबाबत ठोस उपाययोजना झाली पाहिजे. दुकानांसमोरील दुकानदारांचीच अतिक्रमणे हटविण्याचे धाडस दाखवले पाहिजे. प्रसंगी वाहतूक मार्गातील बदलापासून अनेक उपाय करता येण्यासारखे आहेत, ते लोकांना विश्वासात घेऊन केले तर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल. (प्रतिनिधी)
(समाप्त)

Web Title: The need for universal transport measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.