असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एकत्रित येण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:45+5:302021-09-27T04:15:45+5:30
नाशिक : असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्वतंत्र मजदुरी युनियनचे ...
नाशिक : असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्वतंत्र मजदुरी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केले.
युनियनच्या बैठकीत युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी सरकारी सेवेतील पदोन्नतीतील आरक्षणासाठी मोठा लढा द्यावा लागेल, असे सांगितले. संघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी घटनात्मक तरतुदी नसत्या तर मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतेही संरक्षण मिळाले नसते. गुणवत्तेच्या नावाखाली मागासवर्गीयांना डावलले जात असून, आपल्या देशात गुणवत्ता मोजण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले. डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर ज्या उच्चवर्णीयांविरोधात संघर्ष केला, त्यांच्याच संघटनांमध्ये मागासवर्गीय मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अंगणवाडी सेविका चौदा तास काम करतात. मात्र त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले. स्वतंत्र मजदुरी युनियन लवकरच नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी व्यासपीठावर अजय दाभाडे, करुणासागर पगारे, संघदीप उके उपस्थित होते. या बैठकीला रेल्वे मालधक्का कर्मचाऱ्यांचे नेते प्रशांत रोकडे, संदीप जाधव, दिलीप काळे, सागर गांगुर्डे, जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
इन्फो
जिल्हाध्यक्षपदी गायकवाड
स्वतंत्र मजदुरी युनियनच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी जलसंपदा विभागाचे स्वप्नील गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी पाटील यांनी जाहीर केले. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दिनबंधू यांनी प्रास्ताविक केले. किशोर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर स्वप्नील गायकवाड यांनी आभार मानले.