तंत्रज्ञान नव्हे तत्त्वज्ञानाची जगाला गरज : अनिल बोकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:36 AM2019-02-24T00:36:26+5:302019-02-24T00:36:48+5:30
तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.
नाशिक : तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.
दीपक करंजीकर लिखित ‘घातसूत्र’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोकील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदावरी हॉल येथे आयोजित या समारंभप्रसंगी ग्रंथाली प्रकाशनचे संस्थापक दिनकर गांगल उपस्थित होते. यावेळी बोकील म्हणाले. जग युद्धाच्या उंबरठ्यावर असताना करंजीकर यांनी पुस्तकातून नोंदविलेले निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. युद्धामागील तत्त्वज्ञान आणि सूत्रांची मिमांसा त्यांनी पुस्तकातून मांडली आहेत.
यावेळी लेखक करंजीकर यांनी पुस्तक लिखानामागील आपली भूमिका मांडली. कळसूत्रीच्या बाहुल्यांची दोरी इतरांच्या हाती आहे त्याचा वेध ‘घातसूत्र’ पुस्तकातून घेण्यात आला आहे. हे पुस्तक लिहिताना ४८१ पुस्तकांचे वाचन आणि सात वर्षे सतत अभ्यास केल्यानंतर आंतरराष्टÑीय घडामोडीचे बारकावे सप्रमाण मांडले आहे.
कम्युनिझम, सोशालिझम आणि कॅपिटललायझेशन या त्रिसूत्रीवरच युद्धाचे बिझनेस प्लॅन असतात. त्याची किंमत असेक जीव गमावून चुकवावी लागते हेच वास्तव असल्याचे करंजीकर म्हणाले.
पुस्तकाचे अभिवाचन संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री विद्या करंजीकर, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, एटीएसचे डीआयजी दत्तात्रय कराळे यांनी केले.
सायबर कम्युनिटीमुळे युद्धाचा धोका वाढला
वाढत्या तंत्रज्ञान, सायबर इन्फरमेटिव्ह कम्युनिटीमुळे युद्धाचा धोकाच अधिक वाढला आहे. त्यावेळची कटकारस्थाने आता तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा भाग झाल्यामुळे जगापुढे असुरक्षिततेचा मोठा धोका उभा राहिला आहे. तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान यात फरक करता आला पाहिजे. अनुभवातून शिकलेली जुनी पिढी संपन्न असताना आजच्या तरुणांना सर्व तयार माहिती मिळते आणि त्यात अनुभवाचे शहाणपण नसते. अनुभव आणि प्रतिभा एकत्र आले तरच शहाणपण निर्माण होईल आणि तेच जगाला वाचवू शकेल, असे बोकील म्हणाले.