ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मिळते घरचे जेवण
By admin | Published: February 11, 2017 12:43 AM2017-02-11T00:43:32+5:302017-02-11T00:43:48+5:30
बंधुभावाची शिकवण : मनोहर रुग्ण सेवा केंद्रातर्फे एक तपापासून सुरू आहे अन्नपूर्णा योजनेचा उपक्रम
नाशिक : नॅशनल असोसिएशन आॅफ कॅथॉलिक चॅप्लेन्स या जागतिक संघटनेच्या पुढाकाराने ११ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रुग्णदिन म्हणून साजरा करण्यात येतो. रुग्णाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी सर्व समाजाने झटावे याचे स्मरण करून देणारा हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील या दिनाला मान्यता दिली आहे. रुग्णदिनाच्या निमित्ताने रुग्णांच्या हक्कांविषयी कर्तव्यबुद्धीने विचार करायला हवा, असे मत सामाजिक संघटना व्यक्त करतात. परंतु काही सेवा भावी संस्था खऱ्या अर्थाने रुग्णाची सेवा करतात.
मनोहर रुग्ण सेवा केंद्राच्या वतीने रुग्णसेवेचा वसा घेऊन एकतपापासून अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण तसेच वनवासी भागातून जे रुग्ण नाशिक शहरात वैद्यकीय तपासणीसाठी किंवा औषधोपचारासाठी येतात. तेव्हा काही वेळा नियोजनाअभावी किंवा आर्थिक पेच प्रसंगामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचे शासकीय जिल्हा रुग्णालयात आल्यावर जेवणाचे आणि अन्य व्यवस्थेचे फार हाल होतात. अशावेळी त्यातील अत्यंत गरजू व्यक्तींना शोधून त्यांना बंधुत्वाच्या भावनेतून घरचे जेवण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असे म्हटले जाते. महात्मा गांधी यांनी स्वत: कुष्ठरुग्णांची सेवा केली. रुग्णाच्या वेदना कमी करण्याचे काम डॉक्टर करतात, परंतु त्यांना बर वाटण्यासाठी मानसिक आधार देण्याच काम खूप मोलाचे असते. तसेच रुग्णांना घरचे जेवण उपलब्ध करून देणे, फळे किंवा औषधी आणून देणे ही कामे महत्त्वाची असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती संचलित मनोहर रुग्ण सेवेच्या वतीने गेल्या एक तपापासून अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)