सिन्नरच्या ग्रामीण भागात मास्क वापराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 03:36 PM2020-09-11T15:36:57+5:302020-09-11T15:37:22+5:30
सिन्नर : देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे संकट जिल्ह्यात दिवसागणिक गडद होत चालले आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७००च्या आसपास असून, आत्तापर्यंत ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सिन्नर : देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे संकट जिल्ह्यात दिवसागणिक गडद होत चालले आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७००च्या आसपास असून, आत्तापर्यंत ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक बाधित सिन्नर तालुक्यात असूनही नागरिकांकडून गांभीर्य पाळले जात नसून मास्क वापराला कोलदांडा दाखवला जात आहे. तसेच सोशल ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चाही फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टसिंग पाळणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वत:सह कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पाळणे करणे अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे.
सिन्नर तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही नागरिक बेफिकीर राहत असून, तोंडाला मास्क न लावता बिनधास्त वावरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. या निष्काळजी लोकांवर दंडात्मक कारवाई करूनही फारसा उपयोग होत नसल्याने नागरिकांची कोरोनाविषयीची भीती दूर झाली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे.
सिन्नर तालुक्यात एप्रिल महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून होता होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने सक्तीची पावले उचलत लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली होती. टप्प्याटप्याने त्यात शिथिलता देत १ सप्टेंबरपासून सर्वच प्रकारची दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरामधील बाजारपेठ, बॅँका, शासकीय कार्यालये, बाजार समिती यांच्यासह विविध दुकानांत गर्दी दिसून येत आहे.
या सार्वजनिक स्थळांवर वावरणाºया नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचाही समावेश असू शकतो. त्यांच्या माध्यमातून निरोगी व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी किमान तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे तसेच सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांकडून या दोन्ही नियमांचे पालन कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत सर्वेक्षण केल्यानंतर केवळ २० ते ३० टक्के लोकच मास्क किंवा रूमाल बांधलेले दिसून येतात. त्यामुळे कोरोनाचे संकट आटोक्यात येण्याऐवजी त्याचा पसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.