अपहरणाच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्षच
By Admin | Published: September 20, 2015 11:56 PM2015-09-20T23:56:40+5:302015-09-20T23:58:24+5:30
कुटुंबीय पेचात : शेजारीही असंवेदनशील
नाशिक : दीड वर्षाच्या चिमुरडीचा दोनदा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तिडके कॉलनीतील कुटुंबीयांकडे सरकारवाडा पोलिसांनी साफ दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे़ रविवारी पोलिसांनी या कुटुंबीयांची साधी चौकशीही केलेली नाही़ त्यातच ते राहात असलेल्या इमारतीतील शेजाऱ्यांनीही असंवेदनशीलता दाखवत घरमालकांकडे तक्रार केली आहे़
तिडके कॉलनी परिसरातील दीड वर्षीय मुलीचे शुक्रवारी व शनिवारी असे सलग दोन दिवस अपहरणाचा प्रयत्न झाला़ सुदैवाने दोन्ही वेळेस मुलीचे वडील आल्याने अपहरणकर्त्यांनी पळ काढला़ तसेच या मुलीच्या आईला अपहरणकर्त्याच्या चाकूमुळे दुखापतही झाली़ याबाबत तक्रार करण्यास सरकारवाडा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांच्याच उपदेशाचे डोस या मुलीच्या पालकांना पाजण्यात आले़ या प्रकारामुळे भयभीत झालेले कुटुंबीय नातेवाइकांकडे आसरा घेण्यासाठी गेले़
तिडके कॉलनी परिसरातील एका इमारतीत भाडेतत्त्वावर राहणारे हे कुटुंबीय रविवारी घरी परतले़ त्यावेळी या इमारतीतील सदस्यांनी सोसायटीची मिटिंग लावून या कुटुंबीयांना तसेच भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या मालकास बोलावून यांना इथे ठेवू नका, यांच्यामुळे समस्या निर्माण होते, असे सुनावले़ मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांचे असहकार्य त्यात सोसायटीतील शेजाऱ्यांची असंवेदनशीलता यामुळे हे कुटुंबीय पेचात सापडले आहे़ या कुटुंबातील महिलेचा भाऊ पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक असून, त्यांच्या कानावरही ही बाब घालण्यात आली आहे़ तसेच सोमवारी (दि़२१) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करण्यात येणार असल्याचे माहिती कुटुंबातील महिलेने दिली आहे़ (प्रतिनिधी)