ना मिळाले गाढव अन् ना मिळाला जावई..! आनंदावर विरजण, प्रथा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 04:15 PM2023-03-13T16:15:54+5:302023-03-13T16:17:11+5:30
कोरोनाच्या काळात ही धिंड निघाली नाही. त्या अगोदर काही कारणास्तव धिंड निघाली नाही, असे दोन तीन अपवाद वगळता आजतागायत अखंडपणे जावयाची धिंड काढण्यात वडांगळीकर यशस्वी ठरले.
- प्रफुल्ल बकरे
वडांगळी (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील ब्रिटिश काळापासून चालत आलेली ‘जावयाची गाढवावरून धिंड’ प्रथा यावेळी खंडित झाली. सुमारे दीड शतकापासून वडांगळी ग्रामस्थ जावयाची गाढवावर बसवून सवाद्य ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून नंतर त्याचा यथोचित सत्कार करून बोळवण करतात. यावर्षी मात्र वडांगळीकरांना ना गाढव मिळाले ना जावई. त्यामुळे धिंडीचा आनंद घेणाऱ्या वडांगळीकरांच्या आनंदावर विरजण पडले.
कोरोनाच्या काळात ही धिंड निघाली नाही. त्या अगोदर काही कारणास्तव धिंड निघाली नाही, असे दोन तीन अपवाद वगळता आजतागायत अखंडपणे जावयाची धिंड काढण्यात वडांगळीकर यशस्वी ठरले. परंतु यावेळी कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. परंतु ही परंपरा खंडित झाल्याने अनेकांना नवल वाटले. ज्या धिंडीची महाराष्ट्रात नामांकित वृतवाहिन्या,वृत्तपत्रे,समाज माध्यमे आवर्जून दखल घेतात अशी प्रथा अचानक खंडित झाली.
होळी ते रंगपंचमी या काळात कोणत्याही परिस्थितीत गाढव शोधून आणून येनकेन प्रकारे जावई शोधण्यात येऊन त्याची धिंड काढली जातेच. पण यावेळेस तरुणांची उदासीनता, ग्रामस्थांच्या सहभागाचा अभाव आणि महत्त्वाचे कारण आज सिन्नरला खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे मतदान असल्याने वडांगळीमधील सरपंच, आजी माजी आमदारांचे समर्थक, कार्यकर्ते सर्वच निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गेले होते.
आजी-माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे दोन्ही गटांचे समर्थक सिन्नरला सकाळपासूनच तळ ठोकून होते. त्यामुळे गावात गाढव व जावई शोधण्यासाठी कोणतीच यंत्रणा कामाला लागली नाही. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे धिंडीसाठी खर्च कोणी करायचा याची चर्चा गावात होती. ग्रामस्थांनी मनावर घेतले असते तर त्यांच्या ट्रस्टमधून पैसे देता आले असते, नाहीतर या पाच सहा दिवसांत वर्गणी करून मोठा निधी उभारता आला असता. पण ग्रामस्थांसह तरुणांची मानसिकता नसल्यामुळे परंपरा मोडीत निघण्याची नामुष्की वडांगळीकरांवर ओढवली ही खंत आहे.
वडांगळीमध्ये मोठ्या प्रमाणात सतीमाता सामतदादा तसेच अनेक सामुदायिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होतात. त्यासाठी निधी कमी पडत नाही. मग धिंडीसाठीच कोठे घोडे अडले हा संशोधनाचा भाग आहे. सकाळपासून वडांगळीत निघणाऱ्या जावयाच्या धिंडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, रंगपंचमी संपली पण ना गाढव मिळाले ना जावई.