ना रेमडेसिवीर ना व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 08:53 PM2021-04-26T20:53:42+5:302021-04-27T00:07:38+5:30

नितीन गायकवाड विंचूर : कोरोनाची बाधा झाल्यावर अऩेकजणांची भीतीने तारांबळ उडते. मात्र, मानसिक स्वास्थाच्या बळावर अनेकजण कोरोनामुक्त झाल्याची उदाहरणे ...

Neither Remedesivir nor Ventilator | ना रेमडेसिवीर ना व्हेंटिलेटर

कोरोनावर मात केलेले चांगदेवराव शिंदे व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे.

Next
ठळक मुद्देवृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात : घरच्या घरी उपचार करून दिले तोंड

नितीन गायकवाड
विंचूर : कोरोनाची बाधा झाल्यावर अऩेकजणांची भीतीने तारांबळ उडते. मात्र, मानसिक स्वास्थाच्या बळावर अनेकजण कोरोनामुक्त झाल्याची उदाहरणे ताजी असतानाच निफाड तालुक्यातील चांगदेवराव शिंदे (७२) व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे (६६) या शेतकरी दाम्पत्याने चौदा व सोळा स्कोअर पातळी असताना घरच्या घरी उपचार करून कोरोना आजाराने खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे.
निफाड तालुक्याच्या पूर्वकडील गोंदेगाव गावात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. एकीकडे बाधित रुग्णांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे गावातीलच वयोवृद्ध दाम्पत्याने कोरोनावर यशस्वी मात करत सकारात्मक संदेश दिला आहे. सध्या या दाम्पत्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. चांगदेवराव शिंदे व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे (६६) या दाम्पत्याला कोरोनासदृश्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांचा मुलगा शिवाजी शिंदे यांनी प्रथम उपचार म्हणून गावातच स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. सलाईन व गोळ्या घेतल्यानंतरही शिंदे यांना काही फरक जाणवला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी लासलगाव येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले असता, त्यांनी कोविड टेस्ट करण्यासाठी सांगितले. त्यानंतर शिंदे दाम्पत्याची कोविड चाचणी केली असता कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. एचआरसीटी तपासणीत चांगदेवराव शिंदे यांचा स्कोअर १४ व गयाबाई शिंदे यांचा स्कोअर १६ असल्याचे निदान झाल्याने त्यांनी येवला येथेच ॲॅडमिट करण्यासाठी हॉस्पिटलचे शोधाशोध केली. मात्र, स्कोअर पातळी जास्त असल्याने त्यांना कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. त्यांना ऑक्सिजन बेडची गरज असल्याचे सांगण्यात आले. विंचूर, लासलगाव, निफाड, पिंपळगाव, नाशिक येथील हॉस्पिटलला चौकशी केली. मात्र, त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. वय जास्त असल्याने कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून घेतले गेले नाही. यानंतर शिंदे कुटुंबीयांनी घरीच उपचार घेण्याचे ठरविले.

सकारात्मक जीवनशैली
येवला येथील डॉक्टर गायकवाड यांनी दिलेल्या गोळ्या औषधे घेऊन तसेच दररोज सकाळ-संध्याकाळ काढा, सकाळी गरम पाणी, वाफ व सकारात्मक जीवनशैली ठेवून जिगरबाज दाम्पत्याने अखेर कोरोनावर मात केली असून यातून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. याशिवाय त्यांचे लाखो रुपये देखील वाचले असून, ते पूर्वीप्रमाणेच शेतीची कामे करत आहेत. त्यांना ना रेमडेसिवीर ना व्हेंटिलेटरची गरज भासली. शरीराबरोबरच मनही कणखर असल्याचे दाखवून देत सकारात्मक विचार ठेवल्यास कोरोनावर सहजतेने मात करता येत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
असा होता दिनक्रम...
सकाळ संध्याकाळ काढा. सकाळी गरम पाणी व वाफ. सकाळी नाष्ट्यात दोन अंडी. कोरा चहा. अकरा वाजता पोटभर जेवण. त्यानंतर झोप. दुपारी तीनला फळे. थोडेफार शेतीची कामे, पाच वाजता चहा. दोन अंडी. संध्याकाळी सहा वाजता पुन्हा काढा व रात्री ८.३० ला जेवण असा दिनक्रम त्यांनी ठेवला आहे.

Web Title: Neither Remedesivir nor Ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.