निव्वळ नकारात्मकता कारणीभूत

By admin | Published: May 18, 2014 12:06 AM2014-05-18T00:06:03+5:302014-05-18T00:06:03+5:30

नाशिक : ‘जे पेरले तेच उगवते’ हेच आजवर सिद्ध होत आले आहे. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास त्याला उपरोक्त पंक्तीच पुरेशा आहेत.

Net negativity causes | निव्वळ नकारात्मकता कारणीभूत

निव्वळ नकारात्मकता कारणीभूत

Next

 

नाशिक : ‘जे पेरले तेच उगवते’ हेच आजवर सिद्ध होत आले आहे. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास त्याला उपरोक्त पंक्तीच पुरेशा आहेत. काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रिपद पाठोपाठ सलग पंधरा वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिमतीला असताना राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षावर भुजबळ यांची पकड असणे ओघाने आले. अशा वेळी पक्ष संघटनेचे पद असो वा शासन पातळीवरील लाभ असो, साहजिकच भुजबळ यांचा शब्द प्रमाणच ठरला व त्यातूनच राजी-नाराजीचे राजकारण तब्बल पंधरा वर्षे चालले हे नव्याने सांगणे नको. सत्ता-संपत्तीची धुंदी व दिमतीला हुजर्‍यांच्या फौजेमुळे बेपवाई व बेफिकिरी इतकी वाढीस लागली की, त्यातून स्वकीयांचे खच्चीकरणाचे राजकारणही खेळले गेले. त्यासाठी चेल्या- चपाट्यांना कधी त्यांच्या अंगावर सोडण्यात आले तर कधी याच चेल्या-चपाट्यांना अंगाखाली घेण्यात आले. अगदीच स्पष्ट भाषेत सांगायचे तर ज्या मराठा समाजावर आज आगपाखड केली जाते, त्या समाजाला डिवचण्यास सुरुवात कोठून झाली याचा विचार जरी केला तरी त्यातून सारे काही स्पष्ट व्हावे. जे जे विरोधक आहेत असे वाटू लागले, त्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न गेल्या पंधरा वर्षांच्या काळात करण्यात आले. त्यात मराठा, वंजारी आदि समाजाची नावे घेतली जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या सार्‍या गोष्टींचा हिशेब चुकता करण्याची तयारी अगदी निवडणूक जाहीर होण्यापूवीर् पासूनच मतदारांनी केली असेल तर त्यात दोष कोणाचा ? नाही म्हटले तरी, अगदीच नकारात्मका नको म्हणून मराठा समाजाला आमदारकी व वंजारी समाजाला म्हाडाचे सभापतिपद देऊन आपल्याविषयीची नाराजी घालविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न भुजबळ यांच्याकडून करण्यात आला, मात्र असे करताना पुन्हा एकवार राजी-नाराजी ओढवून घेण्यात आली. जातीय समीकरणांचा परिणाम राजकारणात व सत्ताकारणात आपलाच प्रभाव असावा यासाठी भुजबळ यांच्याकडून गेल्या पंधरा वर्षांत करण्यात आलेल्या प्रयत्नांतूनच जातीय समीकरणांचा पाया घातला गेला. त्यामुळे विशिष्ट समाजाचा त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कायम राहिला. मात्र याच दरम्यान ज्या समाजाचे ते राष्टÑीय नेते बनू पाहात अशा समाजाप्रतीही त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यातून त्यांनीच जन्माला घातलेली समता परिषद या निवडणुकीपासून अगदीच अलिप्त राहिली, तर पक्षातही संघटनेवरील निष्ठेपेक्षा व्यक्तिगत निष्ठेलाच आजवर प्राधान्य देण्याची भूमिका राहिल्याने पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ताही भुजबळ यांच्यापासून दुरावला. पेरले तेच उगवले आजवरच्या राजकारणात भुजबळ यांनी जे जे डाव खेळले त्याचा हिशेब चुकता करणार्‍यांचीच संख्या अधिक आहे. एकेकाळी पक्ष संघटनेची धुरा ज्याच्या हाती सोपवून मांडीवर बसवले ते गजानन शेलार विरोधात गेले, तर मित्र पक्षाचे सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्याशी घेतलेला पंगाही त्यांना महाग पडला. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या मतदारसंघात कामे करण्यावरून निर्माण झालेला बेबनावही नाराजीचे कारण ठरले. चेल्या-चपाट्यांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करण्यात आलेले राजकारण व त्यातून नाराज झालेल्यांनी आपला राग थेट भुजबळ यांच्यावरच काढला. त्यांचे समाजातील स्थान काय मराठा समाजाची नाराजी घालविण्यासाठी जयंत जाधव यांना आमदार म्हणून निवडून आणणे व वंजारी समाजाचे नरेंद्र दराडे यांची म्हाडावर नेमणूक करण्यात आली असली तरी, या जाधव व दराडे हे त्या त्या समाजाचे चेहरे व नेते नव्हेत हेदेखील लक्षात घेण्यात आले नाही.

Web Title: Net negativity causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.