नेटकऱ्यांनो...! सोशल मीडियावर युद्धाच्या गप्पा थांबवा; वीरपत्नीची भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 06:37 AM2019-03-01T06:37:04+5:302019-03-01T06:40:58+5:30
नाशिक : आज आमच्या घरातील सैनिकाला वीरमरण आले. उद्या दुसऱ्या कोणा सैनिकाला वीरगती प्राप्त होईल; पण माझी एक देशवासियांना ...
नाशिक : आज आमच्या घरातील सैनिकाला वीरमरण आले. उद्या दुसऱ्या कोणा सैनिकाला वीरगती प्राप्त होईल; पण माझी एक देशवासियांना विनंती आहे, मीडिया आणि सोशल मीडियावर युद्धाच्या गप्पा थांबवा, अशी साद बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या नाशिकच्या निनाद मांडवगणे यांच्या पत्नीने नेटकऱ्यांना घातली आहे.
जम्मु-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले. निनाद हे मुळ नाशिकचे. त्यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त असून ते पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बॅँक ऑफ इंडिया कॉलनीत वास्तव्यास आहेत. निनाद यांचे पार्थीव वायुसेनेच्या विमानातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
यावेळी निनाद मांडवगणे यांची पत्नी विजेता मांडवगणे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. युद्ध हे कोणाच्याही हिताचे नाही. सैन्य सक्षम आहे, त्यांना सल्ले देणे योग्य नाही, असे मी समजते. कारण कृपा करून अशा पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या. आम्हाला युद्ध नकोय, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
तसेच निनाद हा माझे जीवन होता आणि आहे. तो जरी शहीद झाला असला तरी तो आजही आमच्यात आहे, माझ्या तनामनात आहे. निनाद सारखा पती कधीच मिळणार नाही, मी त्याला कधीही विसरू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी निनाद यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.