नवीन ३६ संशयित दाखल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:38 PM2020-04-11T22:38:43+5:302020-04-12T00:34:49+5:30
नाशिक : जिल्ह्यात शनिवारीदेखील तब्बल ३६ नवीन संशयित दाखल झाले असून, जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला नव्हता.
नाशिक : जिल्ह्यात शनिवारीदेखील तब्बल ३६ नवीन संशयित दाखल झाले असून, जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला नव्हता.
शुक्रवारी नाशिक महानगरात दोन आणि मालेगावला एक असे तीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोेग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. विशेषत्वे मालेगावातून कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच नाशिक महानगरातील तीन कोरोनाबाधित हे शहराच्या तीन भिन्न भागातील असल्याने या तिन्ही ठिकाणचा परिसर सील करण्यासह ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण गावभर भटकणाऱ्यांचे प्रमाण बºयाच प्रमाणात आटोक्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारपर्यंत चौदा दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या ६२५ वर पाहोचली आहे, तर शनिवारी सर्वेक्षण करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ४३७ असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी कोरोना संशयित १४, तर त्यांच्या नात्यातील बावीस अशा एकूण ३६ नागरिकांना दाखल करून घेण्यात आले असून, त्या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शुक्रवार आणि शनिवारचे नमुने मिळून तब्बल ११८ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंतच्या नमुन्यांमधील ३०७ नमुने निगेटिव्ह आढळलेले असून, १६ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी दोन संशयितांचे निधन झाले असून, अनेक अहवालांची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. त्यातील काही अहवाल शनिवारी रात्री, तर काही अहवाल रविवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या वतीने पुरेशा उपाययोजना केल्या जात असतानादेखील कोरोना संशयितांची संख्या वाढत असून, शनिवारी (दि ११) एकूण १४ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहरात शुक्रवारी (दि.१०) सापडलेल्या दोन कोरोना बाधितांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात येत आहे.
मनपाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्यानंतरदेखील नाशिक शहरात एक बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर महापालिकेने बाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलो मीटर परिसर सील केला असून, तेथे चौदा दिवस रहिवासींना बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांचे सर्र्वेक्षण, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि आरोग्य विषयक तपासणी सुरू असतानाच शुक्रवारी आनंदवल्ली, नाशिकरोड येथील अशा दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेने या भागातदेखील वैद्यकीय उपाययोजना सुरू केल्या आहेत. मनपाने शुक्रवारपर्यंत २६४ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहेत, तर त्यातील २३५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाले आहेत. सध्या महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ३३ संशयित रुग्ण दाखल असून, अपोलो रुग्णालयात चार जण दाखल आहेत.