नाशिककर पासधारकांसाठी नवीन बोगी

By admin | Published: July 6, 2017 01:02 AM2017-07-06T01:02:01+5:302017-07-06T01:05:15+5:30

पंचवटी एक्स्प्रेस : शुक्रवारपासून नाशिकरोडला उघडणार बोगी

New bogies for Nashikar pass holders | नाशिककर पासधारकांसाठी नवीन बोगी

नाशिककर पासधारकांसाठी नवीन बोगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : पंचवटी एक्स्प्रेसला येत्या शुक्रवारपासून नाशिककर पासधारकांसाठी आणखी एक बोगी जोडण्यात येणार असून, ती नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उघडणार आहे. यामुळे नाशिककर पासधारक प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबई-ठाणे परिसरात नोकरी, व्यवसाय, व्यापार, उद्योग, शिक्षण आदी कामांसाठी दररोज ये-जा करण्यासाठी नाशिककर प्रवाशांच्या दृष्टीने पंचवटी एक्स्प्रेस अत्यंत महत्त्वाची रेल्वे आहे. तसेच अनियमितपणे किंवा कधीतरी मुंबई, ठाण्याला जाणारे बहुतांशी प्रवासी पंचवटीलाच प्राधान्य देतात. पंचवटी एक्स्प्रेसला पासधारकांसाठी एकच बोगी आरक्षित होती. तर मनमाड येथून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसच्या चार सर्वसाधारण बोग्या नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उघडल्या जातात.
अनेक वर्षांची मागणी
गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे परिसरात नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने पासधारकांसाठी एक बोगी वाढवून देण्याची अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती. खासदार हेमंत गोडसे यांनी पासधारकांची मागणी व गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वे व भुसावळ रेल्वे मंडल अधिकाऱ्यांकडे बोगी वाढवून देण्याबाबत चर्चा करून निवेदन दिले होते.
रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे यांनी रेल्वे भुसावळ मंडलाच्या बैठकीत सातत्याने पाठपुरावा करून पासधारकांची संख्या व बोगीची कमतरता यांचे महत्त्व पटवून सांगितले होते. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडल विभागाने येत्या शुक्रवारपासून (दि. ७) पंचवटी एक्स्प्रेसला पासधारकांसाठी एक बोगी वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ती बोगी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उघडणार आहे. यामुळे नाशिककर पासधारक प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.अखेर गैरसोय झाली दूर
मुंबई-ठाणे परिसरात दररोज ये-जा करण्यासाठी नाशिक शहर व आजूबाजूच्या भागातून प्रवासी, पासधारक नाशिकरोड रेल्वेस्थानक येथून चढतात व उतरतात; मात्र पासधारकांसाठी एकच बोगी असल्याने मोठी गैरसोय होत होती. पासधारकांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उशिरा का होईना पासधारकांसाठी एक बोगी वाढविल्याने मोठी गैरसोय दूर झाली आहे.
- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

Web Title: New bogies for Nashikar pass holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.