पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून नवीन ड्रेनेज लाईन ; नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:36 AM2018-11-25T00:36:51+5:302018-11-25T00:37:24+5:30
श्रद्धाविहार कॉलनीत इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता, पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.
इंदिरानगर : श्रद्धाविहार कॉलनीत इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता, पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.
श्रद्धाविहार कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगले, अपार्टमेंट आणि सोसायट्या असून, शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहेत. शिवम पार्क फोरचूनर यासह विविध अपार्टमेंट असून फोरचूनर अपार्टमेंटलगत असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये ड्रेनेजचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. या भागात दुर्गंधी व अस्वच्छेमुळे डेंग्यूसदृश आजाराचे सुमारे सात ते आठ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे या संदर्भात महापालिकेच्या अॅपवर तसेच स्थानिक नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता, उलट दिवसेंदिवस आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. या भागात ड्रेनेजची नवीन पाइपलाइन टाकून मोकळ्या प्लॉटमध्ये सोडण्यात येणारे पाणी रोखण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात आला होता. परंतु काही नागरिक ड्रेनेज टाकण्यास विरोध करीत असल्यामुळे काम सुरू करण्यास अडथळा निर्माण झाला होता. अखेर पोलीस बंदोबस्तात काम करण्यात यावे, असा प्रस्ताव पुढे आल्याने नगरसेवक श्याम बडोदे यांनी पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक श्याम बडोदे, पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील बोडके यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लक्ष वेधले
पूर्व प्रभाग समितीच्या सभेत फोरचूनर अपार्टमेंटच्या लगत मोकळ्या प्लॉटमध्ये सोडण्यात आलेल्या ड्रेनेजच्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरूनसुद्धा मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काम होत नसल्याने नगरसेवक सतीश सोनवणे, दीपाली कुलकर्णी यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याचाच परिणाम म्हणून सदरचे काम हाती घेण्यात आले त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटला आहे.