नवीन शैक्षणिक धोरण : अंमलबजावणीपूर्वीच पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 06:58 PM2020-08-10T18:58:02+5:302020-08-10T18:59:19+5:30
नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. हे धोरण बालवाडी, अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये लागू होणार असले तरी सध्याच्या परिस्थिती प्राथमिकपासून अलिप्त असलेले बालवाडी अथवा पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक म्हणजेच पहिली, दुसरीच्या वर्गांना जोडले जाणार असल्याने या गटासाठी आवश्यक वर्गखोल्यांसह अन्य सोयी-सुविधा कशा उपलब्ध होणार? असा प्रश्न निर्माण झाला.
नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. हे धोरण बालवाडी, अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये लागू होणार असले तरी सध्याच्या परिस्थिती प्राथमिकपासून अलिप्त असलेले बालवाडी अथवा पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक म्हणजेच पहिली, दुसरीच्या वर्गांना जोडले जाणार असल्याने या गटासाठी आवश्यक वर्गखोल्यांसह अन्य सोयी-सुविधा कशा उपलब्ध होणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वीच पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
नवीन धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश आता औपचारिक शिक्षणात करण्यात आला आहे. बालकांची जडणघडण होण्याचा हाचकाळ महत्त्वाचा असतो, प्राथमिक स्तरावर भाषा, विज्ञान, वाचन, लेखन, गणित ते पायाभूत कौशल्ये विकासावर या नवीन धोरणात केलेला विचार हा भारताचे भविष्य घडविणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. तसेच सध्या बालवाडी आणि अंगणवाडी किंवा पहिली ते दुसरीपर्यंतच्या इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले आहे. त्यांनाही काही अंशी चाप लागेल. परंंतु, या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ५+३+३+४ या नवीन सूत्राचा आणताना प्रथम पाचच्या गटात आधीच वर्गखोल्यांची असलेली उणीव कशी भरून काढली जाणार आहे. याविषयी कोणतीही स्पष्टता नसल्याने प्रथम पाचच्या गटातील विद्यार्थ्यांच्या एकत्रित शिक्षणासाठी स्वतंत्र पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी होणार की पूर्वीप्रमाणेच शिक्षणाचा सावळा गोंधळ यापुढेही सुरू राहणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
या सुविधांची भासणार निकड
सध्या प्राथमिक शाळांना आवश्यकतेच्या प्रमाणात वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने पूर्व प्राथमिकचे वर्ग जोडताना अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता भासणार आहे. त्याचप्रमाणे तीन ते पाच वर्ष गटांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतागृह यांसारख्या सुविधांची निकडही भासणार असून, या सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान शासकीय शाळांसमोर निर्माण होणार आहे.