विज्ञानाधारीत जादूचे नवीन पर्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 09:01 PM2021-02-18T21:01:53+5:302021-02-18T21:07:32+5:30
नाशिक : तब्बल ८० वर्षांपासूनच्या परंपरेने आलेल्या जादूला दिलेली आधुनिक विज्ञानाची जोड आणि जगभरातील जादुगारांपेक्षाही काही वेगळे करुन दाखवण्याच्या ध्यासातूनच अत्याधुनिक जादूच्या नवीन पर्वाला प्रारंभ झाला आहे. कोरोना काळातही काही नवीन प्रयोग मी तयार केले असून अशा नवीन-जुन्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ५० जादूंचे सादरीकरण कोरोनानंतरच्या नाशिकमधील पहिल्याच प्रयोगात करणार असल्याचे जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले.
नाशिक : तब्बल ८० वर्षांपासूनच्या परंपरेने आलेल्या जादूला दिलेली आधुनिक विज्ञानाची जोड आणि जगभरातील जादुगारांपेक्षाही काही वेगळे करुन दाखवण्याच्या ध्यासातूनच अत्याधुनिक जादूच्या नवीन पर्वाला प्रारंभ झाला आहे. कोरोना काळातही काही नवीन प्रयोग मी तयार केले असून अशा नवीन-जुन्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ५० जादूंचे सादरीकरण कोरोनानंतरच्या नाशिकमधील पहिल्याच प्रयोगात करणार असल्याचे जगप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले.
जादूगार रघुवीर यांचे नातू आणि अमेरिकेतून एमएस केलेले इंजिनिअर जितेंद्र रघुवीर यांच्या प्रयोगाचे नाशिकमध्ये शनिवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजता कालिदास कलामंदिरात आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न: प्रदीर्घ परंपरा असली तरी विदेशातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही या क्षेत्राकडे कसे आणि का वळलात ?
जितेंद्र रघुवीर : जादूगार रघुवीर हे माझे आजोबा तर विजय रघुवीर हे माझे वडील . आमच्या घराला ८० वर्षांपासूनची जादूची परंपरा आहे. मात्र, मी बालपणापासून हुशार विद्यार्थी असल्याने भारतात मेकॅनिकलमधून बीई तर अमेरिकेतून एमएस पूर्ण करुन भारतात परतल्यावर पदवीदेखील मिळवली. त्यानंतर टाटा कंपनीत मी काही वर्ष प्रॉडक्शनला विभागप्रमुख म्हणूनही काम केले. पण या क्षेत्राकडे पूर्वीपासून असलेला कल आणि या क्षेत्राला आधुनिक विज्ञानाची जोड देण्याच्या ध्यासापोटीच मी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ जादूच्या प्रयोगाकडे वळलो.
प्रश्न: विज्ञानावर आधारीत जादू म्हणजे काय ? याबाबत तुम्ही थोडे अधिक विस्तृतपणे सांगाल का ?
जितेंद्र रघुवीर : जुन्या काळातील जादू केवळ हातचलाखी नव्हत्या, त्यातदेखील विज्ञान होते. मात्र, आता नव्याने करण्यात येणाऱ्या अनेक जादुंमध्ये मॅथ्स, फिजिक्स, जॉमेंट्री या विविध विषयांतील सुत्रांवर आधारीतही जादू असतात. माझ्या प्रयोगात प्रेक्षागृहातील मुलगी हवेत अधांतरी, नोटांचा पाऊस, स्टेजवरील माणूस क्षणार्धात गायब, मान कापण्याचे तसेच हात कापले जाण्याचे मशीन आणि हात पूर्ववत, हुडीनी बॉक्सला लॉक लावूनही त्यात ठेवलेला माणूस क्षणार्धात बाहेर, सावलीपासून माणसाची निर्मिती अशा बहुतांश जादू या कोणत्या ना कोणत्या विज्ञानावर आधारीत असतात.
प्रश्न: जादूच्या क्षेत्रात काही नवीन घडत असते का ? नाशिकच्या प्रेक्षकांना काय नवीन बघायला मिळेल ?
जितेंद्र रघुवीर : जादूो प्रयोग करण्यासाठी मी २७ देश फिरलो. त्यामुळे त्या देशांमधील मोठमोठ्या जादूगारांशीही संपर्क आला. त्यामुळे एकमेकांकडे काही चांगले असल्यास त्यातून काही नाविन्यपूर्ण शिकण्याबराेबरच स्वत: काही नवीन शोधून काढण्याचाही माझा प्रयत्न असतो. कोरोना काळात मी घरी असल्याने त्या काळात मी रिंग ओ मॅजिकचा आधुनिक अविष्कार, मायक्रोवेव्ह मॅजिक, स्वॉर्ड कॅबिनेट, माणसाचे दोन तुकडे करुन पुन्हा जोडणे अशा काही अभिनव जादूचा आनंददेखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
मुलाखत - धनंजय रिसोडकर