नव्या पिढीला व्यावसायिक प्रशिक्षणाचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:28 AM2019-06-25T01:28:24+5:302019-06-25T01:28:58+5:30
व्यवसाय पारंपरिक असला तरी त्याला प्रोफेशल पद्धतीने केल्यास त्या पारंपरिक व्यवसायाचे समग्र स्वरूपच बदलून जाते. नाशिकमधील पारंपरिक केशकर्तन व्यवसायातील नव्या पिढीने हेच हेरून कार्पाेरेट प्रशिक्षणालादेखील महत्त्व दिले.
सलून व्यवसायातील स्थित्यंतरे
नाशिक : व्यवसाय पारंपरिक असला तरी त्याला प्रोफेशल पद्धतीने केल्यास त्या पारंपरिक व्यवसायाचे समग्र स्वरूपच बदलून जाते. नाशिकमधील पारंपरिक केशकर्तन व्यवसायातील नव्या पिढीने हेच हेरून कार्पाेरेट प्रशिक्षणालादेखील महत्त्व दिले. अनेक सौंदर्य प्रसाधन उत्पादन कंपन्यांकडून चालविले जाणारे प्रशिक्षणात दाखल होऊन आणि त्यांचे प्रमाणपत्र होऊनदेखील अनेकांनी नोकऱ्या पत्करल्या आहेत. नाशिकमध्ये प्रशिक्षण घेऊन आता फ्रेंचाईच्या माध्यमातून अन्य व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले जात आहेत. शिवाय मुंबई पुण्यासारख्या अनेक शहरांत कार्पोरेट कंपनीचे पगारी प्रशिक्षक किंवा कर्मचारी म्हणून पन्नास ते साठ हजार रुपयांत कामेदेखील करीत आहेत.
केशकर्तन हा व्यवसाय आता छोटा किंवा पारंपरिक राहिलेला नाही. सौंदर्यवृद्धी म्हणून या व्यवसायाची व्यापकता वाढली आहे. यात पारंपरिक व्यावसायिक नित्य-नियमाने बदल करतातच परंतु आता पारंपरिक प्रशिक्षणाचेदेखील महत्त्व वाढले आहेत. त्यामुळे अनेक जणांना कार्पोरेट सौंदर्य प्रसाधन कंपन्यांनी त्यासाठी प्रशिक्षणाची सोय केली आहे. या कंपन्यामार्फत तीन महिने-सहा महिने असे शिक्षण दिले जातात. पन्नास-साठ हजार रुपयांपासून अगदी सहा लाख रुपयांपर्यंतचे शुल्क आकारून शिक्षण देणाºया या संस्था म्हणजे महाविद्यालयेच ठरल्या आहेत. या कंपन्यांमधून शिकून बाहेर पडणारे युवक आणि युवती स्वत:चे सलून काढतात. किंवा अन्य मोठ्या सलूनमध्ये नोकरी करतात. अनेक कंपन्यांमध्येच काम करण्याची इच्छा असणाºया युवकांना महानगरात प्रशिक्षकाचे काम करता येते किंवा त्यांना अन्यत्र महानगरात सलूनमध्ये काम करता येते. त्यासाठी त्यांना कंपन्याकडून पन्नास ते साठ हजार रुपयांचे वेतन मिळते. त्यामुळे आता कार्पोरेट कंपनीत काम करणे आता प्रतिष्ठेचे लक्षण ठरत आहे.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने व्यावसायिकांकडून प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले जाते, मात्र अनेक फ्रेंचाइजीमध्येदेखील प्रशिक्षण दिले जाते. ज्या सलूनचालकाने फ्रेंचाइजी घेतली आहे. त्याला प्रशिक्षण शुल्कातूनदेखील वाटा मिळत असल्याने त्याला अर्थाजनाचीदेखील मदत होत आहे. प्रशिक्षण घेतल्याने नव्या ठिकाणी नोकरी सुलभ मिळते शिवाय विविध सेवांचे दरदेखील अधिक घेतली जातात. चांगली सेवा असल्याने नागरिकदेखील अशाप्रकारची वाढीव दर देण्यास बघत नाही. नाशिकमध्ये जेथे दाढी-कटिंगचे दर हे पन्नास-साठ रुपयांपासून ते सहाशे रुपयापर्यंतदेखील आकारले जातात. आणि त्या त्या आर्थिक स्तर किंवा हौशी वर्ग त्या त्या ठिकाणी सेवा घेत असतात. पारंपरिक व्यवसायाला मिळालेले प्रशिक्षणाची जोड ही नाभिक समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, त्यामुळे समाजातील नवीन पिढीला यात केवळ उद्योगच नव्हे तर व्यवसायाच्यादेखील संधी मिळत आहेत.
(क्रमश:)
अलीकडे विवाह सोहळ्याप्रसंगी वधू-वरांसाठी खास सौंदर्यवृद्धीसाठी सलुन्सचालकांची मदत घेतली जाते. अशावेळी प्रशिक्षित व्यावसायिक असेल तर त्याला अधिक मागणी मिळते. केवळ वधू-वरच नाही तर मुलीची आई, बहिणी किंवा कुटुंबांचेदेखील पॅकेज अशा सोहळ्यात दिले जाते. अशा पॅकेजची किंमत ही लाख दीड लाख रुपयांपर्यंत आहे.
व्यावसायिकता वाढविण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. माझा मुलगा हर्षद या बी.कॉमची पदवी घेतली आहे, परंतु केशकर्तनाचे प्रगत शिक्षण घेण्यासाठी मुंबईतील एका फर्ममध्ये प्रशिक्षण घेत आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी साठ हजार रुपये खर्च आहे. परंतु या क्षेत्रात प्रगत शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणूनच शिक्षण घेत आहे.
- अनिल वाघ, सामाजिक कार्यकत
नाशिकमध्ये आठ ते दहा कार्पोरेट कंपन्या आहेत. मी स्वत: प्रशिक्षण घेतले आणि प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. संगमनेरपासून अनेक ठिकाणी प्रशिक्षण दिले आहे. या क्षेत्रातील प्रशिक्षण आता काळाची गरज ठरली असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना नाशिकमध्येच नव्हे तर मुंबई- पुण्यासारख्या ठिकाणी चांगली मागणी आहे. प्रशिक्षणामुळे कामकाज आणि दृष्टिकोनात बदल होतो. तो उपयुक्त ठरत आहे.
- कैलास बिडवे, सलून व्यावसायिक