नव्या जीवनमूल्यात साहित्य बाजूला पडले
By admin | Published: October 17, 2016 01:07 AM2016-10-17T01:07:17+5:302016-10-17T01:08:46+5:30
रंगनाथ पठारे : नारायण सुर्वे व कैलास पगारे साहित्य पुरस्कार वितरण सोहळा
नाशिक : माणसाच्या जगण्याची मूल्ये व अग्रक्रम बदलत चालले असून, नव्या जीवनमूल्यात साहित्य हा प्रकार बाजूला पडत चालला आहे, त्याची जागा आता वेगळ्याच आभासी गोष्टींनी घेतली आहे. तसेच असहिष्णुता हा माणसाचा स्वभाव असून तो अधिक प्रमाणात वाढत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.
सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ‘कविवर्य नारायण सुर्वे व कैलास पगारे साहित्य पुरस्कार २०१६’ या कार्यक्रमात प्रा. पठारे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित होते.
यावेळी प्रा. पठारे पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी मराठी साहित्याला मराठी मनात मानाचे स्थान होते. परंतु आता चांगली पुस्तके आली तरी कुणी वाचत नाही. तसेच चांगले समीक्षकदेखील नाहीत. समीक्षक हा चांगला वाचक असतो, तर कलावंत हा सत्याच्या निकट जाण्याचा प्रयत्न करतो. लेखनासाठी वाचन ही प्रथम अट असावी, असेही ते म्हणाले. तसेच पुरस्कारार्थींचा त्यांनी गौरव केला.
याप्रसंगी डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांगितले की, मराठी साहित्यात कविवर्य नारायण सुर्वे यांचे नाव मोठे असून, त्यांच्यामुळे या पुरस्काराला उंची प्राप्त झाली आहे. जागतिक वाङ्मयात अनेक महान कलाकृती असून, त्या मानाने आपल्याकडे मात्र तोकडे साहित्य आहे असेही कसबे म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात कांबळे म्हणाले, कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील बाप माणूस होते. सुर्वे यांचे साहित्य वाचून त्यांच्या आजूबाजूला फिरत आम्ही लिहिते झालो. सुर्वे हे कविता जगत होते. आजच्या नव्या पिढीला अशा साहित्यिकाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर निशांत पगारे, प्रा. डॉ. विवेक खरे, राजू नाईक, डॉ. मनीषा जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘मी जन्माला आलो तेव्हा जात नव्हती आणि कार्ल मार्क्स’ या कवितेचे वाचन करण्यात आले, तर समारोपप्रसंगी कामगार आहे, मी तळपती तलवार आहे या कवितेचे वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. जगताप यांनी, तर डॉ. रोहित कसबे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कवी किशोर पाठक, प्रा. रामदास भोंग, राजू देसले, विलास नलावडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)