‘न्यू पेन्शन स्कीम’ तोट्याचीच
By admin | Published: November 3, 2014 12:16 AM2014-11-03T00:16:15+5:302014-11-03T00:16:56+5:30
सुरेंद्र पालव : टपाल क र्मचाऱ्यांच्या विभागीय अधिवेशनात प्रतिपादन
नाशिक : शासनाची ‘न्यू पेन्शन स्कीम’ अर्थान नवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून त्याला आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनने नेहमीच विरोध दर्शविला आहे. सदर योजना रद्द करण्यासाठी संघटनेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन सहायक सर्क ल सेक्रेटरी ग्रुप ‘सी’ मुंबईचे सुरेंद्र पालव यांनी केले.
आॅल इंडिया पोस्ट एम्प्लॉईज युनियन ग्रुप ‘सी’ पोस्टमन, ग्रुप ‘डी’च्या नाशिक विभागाच्या रौप्यमहोत्सवी संयुक्त द्विवार्षिक अधिवेशनास पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाशिक मुख्य टपाल कार्यालयात आयोजित अधिवेशनाप्रसंगी व्यासपीठावर सर्कल अध्यक्ष जगदीश पवार, नाशिक विभागाचे अध्यक्ष वसंत गांगुर्डे, रामभाऊ परघरमोल आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालव म्हणाले, ‘पोस्ट मास्तर केडर्स’ परीक्षा हे कर्मचाऱ्यांच्या एकतेच्या शक्तीचे विभाजन करण्याचा डाव असून, तरुण कर्मचाऱ्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे. संघटनेकडून कामगारांच्या न्यायहक्कासाठी केली जाणारी आंदोलने अयशस्वी व्हावीत यासाठी ‘पोस्ट मास्तर केडर्स’ ही संकल्पना राबविली जात आहे हे कर्मचाऱ्यांनी समजून घ्यावे. विभागातील टपाल कार्यालयांमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना कु ठल्याही प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागत असेल, तर त्यांनी विनासंकोच संघटनेकडे तक्रार करावी व आपल्या तक्रारीवर अखेरपर्यंत ठाम राहावे, असे आवाहनही पालव यांनी यावेळी केले.
त्याचप्रमाणे संघटनेच्या स्थानिक कार्यकारिणीमधील अंतर्गत वाद हे सहजरीत्या मिटविता येणे शक्य असून, अधिवेशनात असे क्षुल्लक वादविवाद चव्हाट्यावर आणू नये, असा सल्लाही त्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी विभागातील टपाल कर्मचारी व पोस्टमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)