आरोग्य विभागाचे नवीन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:41+5:302021-01-01T04:09:41+5:30
----- जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढल्याने त्याच वर्षी या माता-बाल रुग्णालयाच्या उभारणीस मंजुरी आणि निधी प्रदान ...
-----
जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढल्याने त्याच वर्षी या माता-बाल रुग्णालयाच्या उभारणीस मंजुरी आणि निधी प्रदान करण्यात आला. त्यानंतर काही काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे काम पुढील निधीअभावी ठप्प झाले होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या माता-बाल रुग्णालयाचे काम अर्धवट झाल्यानंतर कोरोना काळात ते पूर्णपणे ठप्प झाले होते. मात्र, आता कोरोनाचा बहर ओसरल्याने पुढील महिन्यापासून या रुग्णालयाच्या उर्वरित कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात जिल्ह्यात या माता-बाल रुग्णालयाचे काम पूर्णत्वाला जाऊ शकणार आहे.
----------------------------
किडनी प्रत्यारोपण विभाग
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या किडनी प्रत्यारोपण विभागाच्या बांधकामाला वेग देण्यात आला असून नूतन वर्षात या विस्तारित भागाचे बांधकाम पूर्ण होऊ शकणार आहे. तांत्रिक मंजुरीसह अन्य प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली असल्याने नूतन वर्षाच्या उत्तरार्धात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण विभागाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकणार आहे.
-------------------------
५ रुग्णालयांना सेंट्रलाइज ऑक्सिजन सीस्टिम
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमूलाग्र बदल घडले आहेत. त्यात जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयाला सेंट्रलाइज ऑक्सिजन सीस्टिम उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, त्याशिवाय अन्य ५ तालुक्यांनाही लवकरच सेंट्रलाइज ऑक्सिजन सीस्टिमची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुके नवीन वर्षात सेंट्रलाइज ऑक्सिजन सीस्टीमने परिपूर्ण बनणार आहेत.
---------------------
कायमस्वरूपी टेस्टिंग लॅब
कोरोनाच्या नमुने तपासणीसाठी परजिल्ह्यांतील लॅबमुळे विलंब होऊ लागल्याने नाशिक जिल्ह्यासाठी एका स्वतंत्र लॅबची मागणी होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून जिल्ह्यासाठी सुमारे दोन कोटींची टेस्टिंग लॅब उभारण्यात आली. कोरोनाच्या पश्चातही ही लॅब व्हायरल डिसीजेस (व्हीडीआरएल) तपासणीसाठी नाशिकसाठी उपलब्ध राहणार आहे.
-------------------------------
कोरोना लसींसाठी शीतसाखळी
व्हॅक्सिनेशनसाठी यापूर्वी मर्यादित स्वरूपात असलेली कोल्ड स्टोअर, आइसलाइन रेफ्रीजरेटर, डीप फ्रीजर या सर्व साहित्य आणि उपकरणांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यात २१३ आइसलाइन रेफ्रीजरेटर, २०१ डीप फ्रीजर, कोल्ड बॉक्स ४,३६३, तसेच व्हॅक्सिन कॅरिअर्स २४,७१० उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोरोनापश्चात भविष्यातील कोणत्याही लसीकरणासाठीही या शीतसाखळीचा उपयोग होऊ शकणार आहे.