प्रेस कामगारांना नवीन पदोन्नती धोरण
By admin | Published: December 12, 2015 11:41 PM2015-12-12T23:41:37+5:302015-12-12T23:43:19+5:30
साडेचार हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांना नवीन पदोन्नती धोरण लवकरच लागू होणार असल्याची माहिती मुद्रणालय मजदूर महासंघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासंबंधी माहिती देताना जगदीश गोडसे यांनी सांगितले की, नाशिकरोडच्या दोन्ही मुद्रणालयांतील साडेचार हजार कामगारांसह देशातील नऊ युनिटच्या तेरा हजार प्रेस कामगारांना या नवीन प्रमोशन पॉलिसीचा लाभ मिळणार आहे. कामगारांना नवीन प्रमोशन पॉलिसी लागू करावी म्हणून जगदीश गोडसे, सुनील आहिरे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची मदत घेऊन दिल्लीत केंद्रीय वित्त सचिव शशिकांता दास, संयुक्त सचिव सौरभ गर्ग यांची भेट घेतली. सध्या कामगार २४००च्या ग्रेडपर्यंत निवृत्त होतात.
फार कमी कामगार २८०० ग्रेड पेपर्यंत जातात. व्हॅकन्सी असेल तरच प्रमोशन मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांवर होणारा हा अन्याय शिष्टमंडळाने वित्तसचिव शशिकांता दास यांना पटवून सांगितला होता. मुद्रणालय महामंडळ संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुद्रणालय कामगारांच्या नवीन प्रमोशन पॉलिसीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता कामगारांना १९०० पासून ४२०० पर्यंत ग्रेड पे मिळणार आहे.
सेवानिवृत्तीमुळे कामगार संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नवीन कामगार भरतीदेखील होणार आहे. मुद्रणालयात दोन नवीन मशीन बसविण्याचे काम सुरू झाले असून, आणखी दोन मशीनला मान्यता मिळाली आहे. या चार मशीनमुळे कारखान्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)