रेल्वेस्थानकात साकारणार नवीन मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:11 AM2017-07-22T01:11:24+5:302017-07-22T01:11:41+5:30
मनमाड : येथील रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, तिकीट बुकिंग कार्यालय ते फलाट क्रमांक एकपर्यंत गर्डर बसविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : येथील रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, तिकीट बुकिंग कार्यालय ते फलाट क्रमांक एकपर्यंत गर्डर बसविण्यात आले. या कामामुळे फलाट क्रमांक एकवरून जाणाऱ्या गाड्या २ वरून रवाना करण्यात आल्या.
उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वेस्थानकावर सुरुवातीला एकच पादचारी पूल होता. त्याला खेटून नवीन पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ असलेल्या रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डपासून फलाट क्रमांक सहापर्यंत दीडशे मीटर लांबीचा हा अत्यधुनिक पूल तयार केला जात आहे. यावेळी स्टेशन प्रबंधक पी. के. सक्सेना, सुधीर गरुड, मुख्य तिकीट निरीक्षक एस.पी. कांबळे, रेल्वेचे अधिकारी जे.एम रामेकर, अंकित गर्ग, नरेंद्र पाटील, गुना शेखर, पुष्पेंद्र सिंग, जी.पी. सरनाईक आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रेसुब निरीक्षक के.डी. मोरे, उपनिरीक्षक रजनीश यादव यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या पुलासाठी आधी पिलर उभे करण्यात आले असून, आज त्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. या कामासाठी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. गर्डर बसविण्याअगोदर पार्सल आॅफिस ते फलाटावर जाणाऱ्या विद्युतवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर १४० टन वजन उचलणाऱ्या दोन क्रेनच्या मदतीने चार गर्डर पिलरवर बसवण्यात आले.
पूल बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्ट यासह इतर सर्व साहित्य हे मनमाडच्या रेल्वेवर्क शॉपमध्येच तयार करण्यात आले आहेत. हा पूल लवकरात लवकर तयार व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असून, दुसऱ्या टप्प्याच्या कामाला ही लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.