Omicron Variant: नाशिकमध्ये २३ तारखेपासून नवीन नियम लागू; ओमायक्रॉनचा धोका पाहता पालकमंत्री छगन भुजबळांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 01:30 PM2021-12-16T13:30:34+5:302021-12-16T13:31:16+5:30
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक बैठक घेतली असून, नाशिककरांची काही नवीन नियम लागू केले जाणार आहेत.
नाशिक: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) देशवासीयांची चिंता वाढताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी काही नवीन नियम २३ तारखेपासून लागू करण्यात आले असून, सर्व सार्वजनिक आस्थापने आणि सार्वजनिक ठिकाणी लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. नाशिकमध्ये ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आताच्या घडीला नाशिकमध्ये ४०१ कोरोना रुग्ण असून, पॉझिटिव्हिटी रेट ०.०८ टक्के आहे. तर मृत्यू दर २.११ टक्के आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे १२ रुग्ण असून, ३७३ मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर १० हजार किट विकत घेण्याची सूचना केली आहे. तर, ८७ टक्के लसीकरण झाल्याचे सांगितले जात आहे.
विना लसीकरण आढळले तर अस्थापनाना जबाबदार धरणार
नाशिकसाठी २३ तारखेपासून नवीन नियम लागू केले जाणार असून, सर्व सार्वजनिक आस्थापने, सार्वजनिक ठिकाणी नवीन नियम लागू असतील. विना लसीकरण लोक आढळले तर अस्थापनांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच पाइव्ह स्टार असो वा अन्य कोणतेही हॉटेल असो, तेथील लोकांच्या तपासण्या करणे गरजेचे आहे, असे नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही कार्यक्रमाला वा अन्य गोष्टींसाठी परवानगी देताना अटींची पूर्तता होत नसेल, तर पोलीस कारवाई करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरचे कार्यक्रम, पार्ट्या यांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
जवळपास १ लाख लसींचा कोटा शिल्लक
नाशिकमध्ये आतापर्यंत ८७ टक्के लसीकरण झाले असून, यापैकी ४० लाख नागरिकांचा लसीचा पहिला डोस, तर २० लाख नागरिकांचा लसीचा दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही सुमारे एक लाख लसींचा कोटा शिल्लक आहे. नागरिक लस घ्यायला येत नाहीत, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.