कोंडीवर नवा उपाय : द्वारका चौकात सिग्नल कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 06:58 PM2020-07-15T18:58:02+5:302020-07-15T19:00:55+5:30
द्वारका चौकात वाहतुक बेटाचा आकार कमी करत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत होती. काही दिवसांपुर्वी येथील वाहतूक बेट लहानही करण्यात आले. सिग्नल यंत्रणाही या चौकात आता कार्यान्वित झाली आहे.
नाशिक : शहराच्या वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आणि १७ रस्ते एकत्र जेथे येतात त्या द्वारका चौकात आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. यामुळे द्वारकेवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
द्वारका चौक हे शहराचे प्रवेशद्वार मानले जाते. महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने द्वारका चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. आठवडाभरापासून या चौकात सिग्नलचे दिवे लागले आहे. बुधवारी (दि.१५) सिग्नलच्या उद्घाटनाची औपचारिकताही पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुर्ण करण्यात आली.
द्वारकेची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यापुर्वीही विविध उपाययोजना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आल्या. रस्ते एकेरी करणे, रिक्षा थांबे स्थलांतरीत करणे, अवैधरित्या थांबणाऱ्या बसेस, टॅक्सींवर कारवाई करणे, भुयारी मार्ग वापरात आणण्यासाठी प्रयत्न अशा विविध उपाययोजना करण्यावर भर दिला गेला. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदतही झाली. अवजड वाहतूकीच्या द्वारकावरील प्रवेशाबाबतही वेळेचे निर्बंध घालण्यात आले. पुणे महामार्गावरून येणारी अवजड वाहतूक पर्यायी रिंगरोडवरून वळविण्यात आली.
द्वारका चौकात वाहतुक बेटाचा आकार कमी करत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत होती. काही दिवसांपुर्वी येथील वाहतूक बेट लहानही करण्यात आले. सिग्नल यंत्रणाही या चौकात आता कार्यान्वित झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास शहर वाहतूक नियंत्रण शाखेला आहे.