नव्या स्ट्रेन विषाणूमुळे अधिक दक्षतेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:34 AM2021-01-13T04:34:02+5:302021-01-13T04:34:02+5:30
नाशिक : स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची ...
नाशिक : स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची मोहीम या महत्त्वाच्या बाबींबरोबरच नव्याने आलेल्या स्ट्रेनसंदर्भतही दक्षता बाळगावी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात कोरोना आढावा बैठकी प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस उपाधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.आर. श्रीवास, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ.आवेश पलोड, तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव हा जलद गतीने होत असल्याने, ब्रिटन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे. परदेशातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांपैकी कुणी प्रवासी, जर नाशिकला येत असेल, अशा प्रवाशांची माहिती नाशिक प्रशासनाला कळविण्यात यावी, असे मुंबई प्रशासनास सांगण्यात आले असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले.
येत्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. त्यामुळे फक्त शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर सुरू ठेवण्यात येऊन शाळा, महाविद्यालये व खासगी ठिकाणी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर्स बंद करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नाशिक जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी ३ हजार ४२३ रुग्णसंख्या होती. आज रुग्णसंख्या १ हजार ७०१, अर्थात निम्म्यावर आली आहे. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक असून, जिल्ह्याचा मृत्युदरही १.६५ टक्के इतका आहे. कोरोना लसीकरणाबाबत नुकताच जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात आला असून, जिल्ह्यात लस साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज क्षमता आवश्यतेपेक्षा दीडपटीने अधिक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीच्या वेळी दिली.
---इन्फो----
रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेचे ऑडिट भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेची सार्वजनिक बांधकाम व अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन, त्याबाबत नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे, फायर एक्स्टिंग्विशर हाताळणीसंदर्भातही कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने, संबंधितांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.