नाचलोंढीच्या वर्षाने गाजवली दिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:20 AM2018-02-24T00:20:23+5:302018-02-24T00:20:23+5:30
आगामी आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून, गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
पेठ : आगामी आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून, गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे. सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिच्या आंतरराष्ट्रीय यशाने प्रेरित झालेल्या नाचलोंढी येथील वर्षा चौधरी हिनेही कठोर मेहनत करून आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागासाठी कंबर कसली आहे. दिल्ली येथे गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) व नॅशनल युवा को-आॅप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पात्रता स्पर्धेत इंडियन तेज गेल रफ्तार प्रकारात बेस्ट टाइमिंग साधत ४०० मी.मध्ये मेडल पटकावत आपली विजयी दौड कायम ठेवली आहे.
आदिवासी भागातील दºयाखोºयातील खडतर मार्गावरून अनवाणी धावणारी वर्षा आता देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने नाचलोंढी गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सावरपाडा एक्सप्रेसनंतर आता लवकरच नाचलोंढी सुपरफास्ट जगाच्या नकाशावर झळकणार आहे. प्रशिक्षक भगवान हिरकूड, विजेंद्र सिंह यांचे तिला मार्गदर्शन मिळत आहे.