मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्ष जल्लोष थंड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 10:20 PM2020-12-24T22:20:16+5:302020-12-25T01:05:33+5:30
देवगांव : यंदा कोरोनाचे विघ्न आणि ३१ डिसेंबरला आलेल्या मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्षाचा जल्लोष थंड राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच कोरोनामुळे शासनाकडून अद्यापही काही निर्बंध लागू असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
देवगांव : यंदा कोरोनाचे विघ्न आणि ३१ डिसेंबरला आलेल्या मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्षाचा जल्लोष थंड राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच कोरोनामुळे शासनाकडून अद्यापही काही निर्बंध लागू असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सन २०२० मधील सर्वच सणांचा जल्लोष कोरोनाच्या वाढत्या विघ्नामुळे हवेत विरला. नागरिकांनी जबाबदारीने शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपोत्सवसारख्या सणांवर पाणी सोडले. आता ३१ डिसेंबरला तरी नववर्ष जल्लोष साजरा करायला मिळेल, अशी नागरिकांना अशा होती. मात्र, अद्याप कोरोना लस विकसित झाली नसल्याने यंदा नववर्षाचे स्वागत साध्या व मोजक्याच मित्रमंडळींच्या साथीने साजरा करावा लागणार आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आल्याने बहुतेक सर्व नागरिक बुधवारीच नववर्ष जल्लोष साजरा करतील. हा जल्लोष साजरा होत असताना पोलिसांची मात्र त्यावर करडी नजर असणार आहे. दरवर्षी नववर्ष जल्लोष म्हटला की, ग्रामीण भागातील रिसॉर्ट, धाबे, हॉटेल यांसारखी ठिकाणे फुल्ल होतात. मात्र, यंदा कोरोनाविघ्नामुळे रिसॉर्ट, हॉटेलमध्ये अपेक्षित असे बुकिंग न झाल्याचे दिसत आहे.
कोरोना विघ्नामुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागलेला सामान्यवर्गही यावर्षी नववर्ष सेलिब्रेशनपासून दोन हात लांब राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्गशीर्ष गुरुवारमुळे मांसाहारींची कोंडी होणार आहे. महामारीनंतर लॉकडाऊन शिथिल करून रिसॉर्ट, हॉटेल,धाबे यांना परवानगी असली तरी, कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिकांनी रिसॉर्ट, हॉटेल, धाबे याकडे पाठ फिरवली आहे.
व्यावसायिकांना बसणार आर्थिक झळ
बुकिंग मंदावल्याने रिसॉर्ट, हॉटेल आणि धाबे व्यावसायिकांना आर्थिक झळ बसणार आहे. कोरोना अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याने मोठ्या पार्टीचे बेत आखताना नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. फिजिकल डिस्टनसिंग, मास्क यांसारख्या नियमांचे पालन करूनच नागरिकांना पार्टीचे बेत आखावे लागणार आहेत.