नाशिकमध्ये नववर्ष स्वागताची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:12 AM2018-12-25T00:12:11+5:302018-12-25T00:12:48+5:30
उत्सवांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील विविध हॉटेल्स तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांसह तरुणांचे वेगवेगळे ग्रुप नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करीत आहेत.
नाशिक : उत्सवांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील विविध हॉटेल्स तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांसह तरुणांचे वेगवेगळे ग्रुप नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करीत आहेत. त्यामुळे नाशिककरांना शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत धार्मिक कार्यक्रमांचीही मेजवानी अनुभवता येणार आहे. नाशिक शहरासह उपनगर नाशिकरोड, सिडको, सातपूर आडगाव परिसरातील चांगल्या सुविधा देणाऱ्या कृषिपर्यटन केंद्र आणि हॉटेल्सला तरुणाईची पसंती मिळत असून, अनेकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला तर काहींनी नववर्षाच्या पहाटे जल्लोषाची तयारी केली असून, काही तरुणांची रात्रभर जागरण करून नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी आहे.
शहरातील क्लब, हॉटेल व्यावसायिकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमासह भोजन आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अनेकदा गर्दीला आवरणे हॉटेल मालकांना फारच अवघड जाते. हॉटेलच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मेन्यूत वाढ करून गर्दी कमी करण्याचा काही हॉटेल मालकांचा प्रयत्न दिसून येत आहे. अनेकांनी इमारतीच्या गच्चीवर पार्टीचे आयोजन केले आहे. तसेच सोसायटीच्या आवारातही कौटुंबिक नवे वर्ष सेलिब्रेशनचेही आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस विभागही सज्ज झाला आहे.
सोसायटी आवारात सेलिब्रेशन करून नववर्षाचे स्वागत करणाºया सोसायट्यांनी ध्वनीक्षेपकाची परवानगी घेणे आवश्यक असल्याने त्यांना कार्यक्रमापूर्वीच संबंधित परवाने मिळवून पोलीस प्रशासनाला कार्यक्रमांची माहिती द्यावी लागणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत अनेकजण मद्यधुंद अवस्थेत करतात, त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या भागात तसेच मुख्य रस्त्यांवरही पोलिसांना करडी नजर ठेवण्याचे आव्हान आहे.
कोकण, गोवा पर्यटनाचे बेत
नाशिकमधील वेगवेगळ्या वाइनरी आणि कृषिपर्यटन केंद्रासह नामांकित हॉटेल्समध्ये नववर्ष स्वागताच्या मेजवान्या रंगत असल्या तरी नाशिककर तरुणाईला शहराबाहेर पडून आनंदोत्सव करण्याची भारी हौस आहे. त्यामुळे अनेकजण कोकण, गोव्यासह केरळच्या सहलींचेही नियोजन करीत आहेत. तर अनेकांनी गडकोटांवर स्वच्छता करून नववर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे.
शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
४नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातही नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी दिसून येत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी गाण्यांच्या मैफलींसह गतवर्षातील आठवणींना उजाळा देणारे गप्पाटप्पांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे विविध सामाजिक व सांस्कतिक संघटनांकडून रामकुंड गोदाघाट परिसरात दीपप्रज्वलन, रांगोळी असे विविध उपक्रम राबवून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.