Omicron Variant : कोरोनाचा कहर! नववर्षाचे स्वागत अन् पोलिसांपुढे ‘ओमायक्रॉन’चे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:53 PM2021-12-29T12:53:24+5:302021-12-29T13:00:03+5:30
महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहे. रात्रीची जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नुकताच नाताळचा सण आटोपला, आता नववर्षाचे स्वागत, पार्ट्यांचे बेत आणि होणारी गर्दी यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांना निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा ‘ॲक्शन माेड’मध्ये यावे लागणार असल्याचे चित्र आहे. राज्यात गेल्या शुक्रवारपासूनच रात्री ९ ते संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५० टक्के तर आसनक्षमता निश्चित नसलेल्या समारंभस्थळी २५ टक्के उपस्थितीलाच परवानगी दिली जात आहे. खुल्या जागेत समारंभ असल्यास २५ टक्के उपस्थिती चालणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे; मात्र कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. लग्नसोहळे जर मंगल कार्यालयात किंवा बॅन्क्वेट हॉलसारख्या बंदिस्त ठिकाणी होत असतील तर शंभरापेक्षा जास्त लोकांना तेथे एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. खुल्या आकाशाखाली अर्थात लॉन्समध्ये लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रम आयोजित केले जात असतील तर २५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. हाच नियम सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसाठीही लागू असल्याचे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या नव्या आदेशाची धास्ती नागरिकांमध्ये पहावयास मिळत असली तरी खबरदारी फारशी घेताना नागरिक अद्यापही दिसत नाहीत.
‘थर्टी फर्स्ट’पासून कठोर अंमलबजावणीची शक्यता
शहरात अद्याप या निर्बंधाची पोलिसांकडून अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाही; मात्र थर्टी फर्स्टपासून कदाचित पोलीस आयुक्तांकडून या निर्बंधाच्या संबंधित नवीन आदेश काढला जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून सार्वजनिक समारंभ, सोहळे यांना परवानगी देताना अत्यंत काटेकोरपणे सर्व आवश्यक बाबींची पडताळणी केली जात आहे.
-अझहर शेख