मेहंदी पुसण्याअगोदर नववधूचा ह्रदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 03:58 PM2019-07-16T15:58:46+5:302019-07-16T15:58:58+5:30
साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी थाटात आणि आनंदात लग्न झालेल्या सोनवणे परिवारातील नववधू मंगल सोनवणे (१९) हिचा हातावरची मेहंदी पुसण्याअगोदर मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी थाटात आणि आनंदात लग्न झालेल्या सोनवणे परिवारातील नववधू मंगल सोनवणे (१९) हिचा हातावरची मेहंदी पुसण्याअगोदर मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे सोनवणे परिवारावर दुख:चा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि बेरोजगारीने हैराण झालेल्या ग्रामीण भागातील बळीराजा हतबल झाला असतांना सुशिक्षित बेरोजगार तरु णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्या अनुशंगाने आपल्या मुलाचे लग्न कसे करावे असा गंभीर प्रश्न प्रत्येक बापापुढे संकट म्हणून उभा ठाकला आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील अवघी दोन एकर कोरडवाहू शेती असणारा शेतकरी गंगाधर दौलत सोनवणे यांना तीन मुले आहेत.पैकी एकाचे लग्न झाले होते. तर दुसºया मुलाचे लग्न करण्याचा प्रश्न होता. म्हणून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ येथून पोटाची खळगी भरण्यासाठी गोकुळ नथू खैरनार हे आपल्या कुटुंबासह साकोरा येथे चार वर्षांपूर्वी आलेले होते. त्यांना देखिल पाच मुली असून मोठी मुलगी मंगल आणि सोनवणे परिवारातील सागर यांचा विवाह याच महिन्यात ५ जुलै रोजी थाटात संपन्न झाला. त्यासाठी वरपिता गंगाधर सोनवणे यांनी स्वत:ची दोन एकर जमीन पडीक ठेऊन तसेच लहानपणापासुन सांभाळून ठेवलेली बैलजोडी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावणीत दाखल केली होती. केवळ लग्नासाठी बैलजोडी पन्नास हजारात विकून, पतसंस्थेचे पन्नास हजार रु पये कर्ज आणि नातेवाईकांकडून उसनवारीचे काही पैसे असे एकुण तीन लाख रूपये स्वत: खर्च करून लग्न सोहळा पार पडला.मात्र त्यानंतर आठच दिवसात नववधू मंगलची अचानक प्रकृती बिघडली आणि खाजगी दवाखान्यात उपचार सुरू केले.मात्र आज सकाळी लग्नानंतर अवघ्या अकराव्या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मंगलचा हाताची मेहंदी पुसण्याअगोदर मृत्यू झाल्याने सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.