नवोदितांनी कलाक्षेत्रात झोकून द्यावे :उत्तमराव पाचारणे :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:17 AM2020-02-17T01:17:17+5:302020-02-17T01:18:17+5:30
आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले.
नाशिक : आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले.
शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात नाशिक कलानिकेतनच्या ७७व्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे रविवारी (दि.१६) उत्तमराव पाचारणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाचारणे म्हणाले की, माध्यमे महाग असली तरीही हुकूमत असलेल्या शिक्षकांचा सहवास लाभल्याने जीवनात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचा अनुभव सांगतानाच मर्यादित ध्येय ठेवून शिक्षणास सुरुवात केल्यानंतरही कला शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातूनही जीवनाच्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. व्यासपीठावर शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, उपाध्यक्ष बापू गर्गे, चिटणीस दिनकर जानमाळी, प्राचार्य अनिल अभंगे आदी उपस्थित होते. यावर्षी कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी कोल्हापूर येथील ज्येष्ठ चित्रकार डॉ. नलिनी भागवत यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कला प्रदर्शनात अॅबस्ट्रॅक्ट, पोट्रेट, लॅण्डस्केप, इंडियन आर्ट, क्रिएटिव्ह आर्ट, ग्राफिक आर्ट अशा १७५ हून अधिक चित्रांचा समावेश असून, नाशिककरांना शुक्रवार (दि.२०) पर्यंत या कलाविष्काराचा आस्वाद घेता येणार आहे. प्रास्ताविक प्रा. रघुनाथ कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निशा पाटील यांनी केले. राजेंद्र ओढेकर यांनी आभार मानले.
पारितोषिक विजेते
अखिल भारतीय कला प्रदर्शन २०२० मध्ये विद्यार्थी विभागातून सर्वोत्कृष्ट पेंटिंगसाठी चेतन पाटील यास सुवर्ण पदक, सर्वोत्कृष्ट पोट्रेटसाठी क्रिशिता सलियन हिला रौप्य पदक व लॅण्डस्केपसाठी राहुल सातपुते यास कांस्य पदक प्रदान करण्यात आले. तर व्यावसायिक विभागात सर्वोत्कृष्ट पेंटिंगसाठी किरण चौधरी यांना सुवर्ण पदक, सर्वोत्कृष्ट पोट्रेटसाठी सुरेश जांगिड यांना रौप्य व लॅण्डस्केपसाठी ज्ञानेश्वर डंबाळे यांना कांस्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले.