जिल्हा रुग्णालयातील एनएससीयू कक्षासाठी नव्याने मिळाले नऊ इन्क्युबेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 10:03 PM2017-10-03T22:03:03+5:302017-10-03T22:03:07+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनएससीयू कक्षासाठी नव्याने मिळालेले नऊ इन्क्युबेटर मंगळवारी (दि़३) सायंकाळपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ यामुळे जिल्हा रुग्णालयातील पूर्वीची १८ व नवीन ९ अशी २७ इन्क्युबेटर झाली आहेत़ तर आणखी सात इन्क्युबेटर येत्या दहा दिवसांत जिल्हा रुग्णालयास मिळणार आहेत. या विभागात पाच महिन्यांत १८७ तर आॅगस्टमध्ये ५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़
जिल्हा रुग्णालयातील या विभागातील अर्भकांचा प्रश्न माध्यमांनी मांडताच आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयास भेट दिली होती़ तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून इन्क्युबेटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानुसार चार दिवसांपूर्वी ९ इन्क्युबेटर प्राप्त झाले व तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून ते कार्यान्वित करण्यात आले़ यामध्ये लहान अर्भकांना या इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले आहे़
जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू कक्षात वैद्यकीय अधिकारी, दोन बालरोगतज्ज्ञ व १८ अधिपरिचारिकांची नियुक्ती करण्यात आली होती़ तसेच नव्याने तयार झालेल्या इन्क्युबेटर्स कक्षासाठी जादा कर्मचारी नियुक्तीला मंजुरी दिली होती़ त्यानुसार १८ अधिपरिचारिकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे डॉ़ जगदाळे यांनी सांगितले़