नाशिक महापालिका : भरतीचा बार उडणार, आकृतीबंध सादर करणार; प्रशासनाकडून हालचाली सुरु
By Suyog.joshi | Published: September 20, 2023 10:08 PM2023-09-20T22:08:32+5:302023-09-20T22:09:27+5:30
दरम्यान कोणत्या विभागानुसार शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा श्री गणेशा होणार आहे.
नाशिक : रखडलेल्या महापालिकेतील नोकर भरतीला गती येणार असून लवकरच ४९ विभाग त्यांचा आकृतिबंध महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना सादर करणार आहे. दरम्यान कोणत्या विभागानुसार शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा श्री गणेशा होणार आहे.
महापालिकेत मागील तब्बल चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. याचा मोठा फटका पालिकेच्या कामकाजावर होतो आहे. नोकर भरतीसाठीचे काम टीसीएस कंपनीला देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाकडून प्रारंभी आरोग्य, अग्निशमन या विभागातील ७०६ पदांसाठी भरती करणार आहे. ही भरती झाल्यानंतर उर्वरीत पदांकरिता नोकर भरती होइल.
यापूर्वी महानगरपालिकेने भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडे १४ हजार रिक्त जागांचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला होता. परंतु महापालिकेने पाठविलेल्या आकृतीबंधात अनेक त्रुटी आढळल्या. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केल्यावर पालिकेवर ताण वाढेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे शासनाने हा आकृतीबंध पुन्हा महापालिकेला पाठवत त्रुटी दूर करुन नव्याने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अंतिम आकृतीबंध तयार करुन तो आयुक्तांना सादर करुन शासनाच्या नगररचना विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल.
दरम्यान महापालिकेची हद्द दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरवासियांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी वाढली आहे. पालिकेतून महिन्याला अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. महानगरपालिकेच्या जवळपास साडे सात हजार कर्मचाऱ्यांपैकी आज मितीस तीन ते चार हजारांच्या आसपास कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिककरांना उपलब्ध मनुष्यबळात सोयीसुविधा देताना महापालिकेवरील ताण वाढला आहे. कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने दिसत आहे.
नोकर भरती प्रक्रिया पुढच्या काही दिवसात सुरु होऊन महापालिकेत नोकर भरतीची प्रकिया सुरु असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
-लक्ष्मण साताळकर, उपायुक्त प्रशासन, मनपा