वृत्तपत्र विक्रेत्यांनी लुटला सायकल स्पर्धेचा आनंद
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:30+5:302015-12-14T23:52:31+5:30
‘सायकल राजा’ : मकरंद उगले प्रथम, किरण मराठे द्वितीय
नाशिक : पेपर वितरकांची ‘सायकल राजा’ स्पर्धा नाशिक सायकलिस्टच्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांकडील सायकलवर पेपर टाकणारी मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
शहरातील गोदाकाठालगत सकाळी नऊ वाजता आनंदवली-मखमलाबाद जोड रस्त्यावर सायकल स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला महापौर अशोक मुर्तडक यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी, राज लुथरा आदि उपस्थित होते. दरम्यान, सहभागी शंभर स्पर्धकांना टी-शर्ट, हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
एकूण दहा किलोमीटरचे अंतर या स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आले होते. बोट क्लब पूल, चांदशीरोड, मुंगसरारोड, भाग्योदय कॉलनीमार्गे पुन्हा बोट क्लब पूल असा सायकल फेरीचा मार्ग होता. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते वयोवृध्द नागरिकदेखील सहभागी झाले होते. या स्पर्धेत मकरंद उगले (प्रथम), किरण मराठे (द्वितीय), नीलेश ठाकरे (तृतीय) या विजेत्यांना अनुक्र मे रुपये तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये रोख असे बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रॅम विजेते सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, मनीषा रौंदळ, सुनील खालकर, दत्तू आंधळे, नाशिक वृत्तपत्र वितरक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सरचिटणीस विनोद पाटील, रमेश महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.