दुसऱ्या दिवशी ४५ कर्मचारी कामावर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 01:49 AM2021-12-23T01:49:13+5:302021-12-23T01:49:32+5:30
एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी दिलेल्या दोन दिवसांची मुदत बुधवारी संपुष्टात येत असल्याने गुरुवारपासून एस.टी. महामंडळ कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत जवळपास ६० कर्मचारी कामावर परतल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
नाशिक : एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी दिलेल्या दोन दिवसांची मुदत बुधवारी संपुष्टात येत असल्याने गुरुवारपासून एस.टी. महामंडळ कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत जवळपास ६० कर्मचारी कामावर परतल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या दुखवटा आंदोलनप्रसंगी अनेक घडामोडी घडत आहेत. या संपाबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी असल्याने दिवसभर कर्मचाऱ्यांचे लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले होते. न्यायालयाकडून पुढील महिन्याची ५ तारीख मिळाल्याने यासंदर्भातील निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे.
कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि आजवर झालेली कारवाई मागे घेण्याचे आश्वासन देत परिवहनमंत्र्यांनी कामगारांना कामावर परतण्याचे आवाहन केले होेते. त्यानुसार, गत दोन दिवसांमध्ये एकूण ६० कर्मचारी रुजू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय सिन्नर, नांदगाव आणि इगतपुरी हे तीन डेपो सुरू झाले असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या सिन्नर आगारातून २, इगतपुरीतून २, येवला येथून ११, पिंपळगाव डेमोमधून १४, नांदगाव डेपो १, तर लासलगाव डेपोतून ९ बसेस सोडण्यात आल्या आहेत. नाशिक आगारातून सुरू असलेल्या खासगी शिवशाही सुरूच आहेत. बुधवारी येथून एकूण २५ बस सोडण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
--इन्फो--
कर्मचाऱ्यांना वॉच
संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांना कामावर बोलविण्यासाठी काही संघटनांकडून प्रयत्न केला जात असल्याची चर्चा असल्यामुळे संपातील कुणीही कर्मचारी फुटणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. यासाठी कर्मचारी एकमेकांची विचारणा करीत असून कोण जागेवर आहेत किंवा कोण कुठे गेलाय, याबाबतची जागरूकता दाखविली जात आहे.