पेठमध्ये दुसऱ्या दिवशीही संततधार
By admin | Published: August 4, 2016 12:52 AM2016-08-04T00:52:36+5:302016-08-04T00:52:47+5:30
घरांची पडझड : भातशेतीचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी
पेठ : शहरासह तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार सुरूच असून, नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर ओसंडून वाहत आहे. वाघेरा घाटातील एकेरी वाहतूक बुधवारी सायंकाळी सुरू करण्यात आली.
गत दोन दिवसापासून संपूर्ण तालुक्यात मुसळधारेने हाहाकार उडवला आहे. गावोगावी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, भिंतींना ओल आल्याने घरसंसार उघड्यावर पडले आहेत. जवळपास सर्व नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. घाट रस्त्यावर मातीचे भराव खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
भुवन घाटात दरड कोसळली
भुवनच्या घाटात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने भुवन, खामशेत, खडकी, आंबापाणी, बोंडारमाळ, उम्रद, बोरपाडा, बिलकस आदि गावांचा पेठशी संपर्क तुटला असून, पेठ, भुवन, हरसूल मार्ग बंद झाला आहे. दमणगंगासह लहान-मोठ्या नद्यांना प्रचंड पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोटंबी घाटातील दरड हटविण्याचे काम मजुरांच्या साह्याने केले जात असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
पंचनामे करण्याची मागणी
मुसळधार पावसाने लावणी केलेले भात व नागलीच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, प्रशासनाने शासकीय यंत्रणेकडून तत्काळ पंचनामे करून अहवाल
सादर करण्याची मागणी करण्यात येत आहे. घाटात मोठी दरड कोसळल्याने दोन दिवसांपासून नाशिक - हरसूल मार्ग बंद होता. प्रवाशासह वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात दरड हटवण्यावरून कलगीतुरा सुरू असल्याने रस्ता मोकळा करण्यात विलंब झाला असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)