पुढील साहित्य संमेलन उदगीरला शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 01:53 AM2021-12-05T01:53:05+5:302021-12-05T01:53:28+5:30
अनेक अडचणी आणि वादांवर मात करत सुरू झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. ५) सूप वाजणार असून, त्यानंतर पुढील संमेलन उदगीरला होणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात शनिवारी (दि. ४) नाशिकमध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संमेलनाच्या समारोपासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
नाशिक : अनेक अडचणी आणि वादांवर मात करत सुरू झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. ५) सूप वाजणार असून, त्यानंतर पुढील संमेलन उदगीरला होणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात शनिवारी (दि. ४) नाशिकमध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संमेलनाच्या समारोपासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
कोरोनाच्या दोन लाटा आणि त्यामुळे घालण्यात आलेले निर्बंध दूर करण्यात आल्यानंतर पूर्वनियोजनापेक्षा मेाठ्या विलंबाने अखेरीस ३ ते ५ डिसेंबर दरम्यान नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत संमेलन भरविण्यात आले. दोन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक कुसुमाग्रज नगरीत सुरू झाली आहे. रविवारी संमेलनाचा समारोप होणार असून, त्यानिमित्ताने विविध विषयांवरील ठरावांवर चर्चा झाल्याचे समजते. या संमेलनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा मु्द्दा पुन्हा चर्चिला गेला. त्यातही असा दर्जा देण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीने केंद्र शासनाला अहवाल दिल्याने आता हा दर्जा मिळावाच ही मराठी जनांची आणि सारस्वतांची भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संमेलनात तसा ठराव होणे अटळ मानले जात आहे. याशिवाय आगामी संमेलन स्थळाबाबतदेखील प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. नाशिकचे संमेलन मार्च महिन्यात होणार होते. ते डिसेंबर महिन्यात झाले. म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात झालेले नाही. आता यंदाच्या आर्थिक वर्षात हे संमेलन होण्यासाठी आता अत्यंत घाईने म्हणजे मार्च महिन्याच्या आत घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळे उदगीरला संमेलन भरविण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. रविवारी संमेलनाचा समोराप होणार असून, त्यावेळी ठरावांचे चित्र स्पष्ट होईल.
या संमेलनाचा समारोप रविवारी (दि. ५) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. शरद पवार आणि न्या. चपळगावकर यांचे नाशिकमध्ये आगमनही झाले आहे.
दरम्यान, मुलाखती, सत्कार आणि प्रात्यक्षिके यांनी संमेलनाचा दुसरा दिवस गाजला. नाशिकच्या साहित्य संमेलनात प्रथमच झालेल्या बालकुमार साहित्य मेळाव्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुलेखनकार अच्युत गोडबोले यांच्या सुलेखनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली. तर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सक्रिय मदत करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील पन्नास ग्रंथांचे प्रकाशन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी केले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे दूरदृष्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते. या संमेलनात नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे तसेच ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचे सत्कार माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले तसेच कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. गझल कट्टा तसेच पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
इन्फो...
मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांची गैरहजेरी
संमेलनातील दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ अनेक मान्यवरांनी दांडी मारली. संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी प्रकृती बरी नसल्याने येण्यास नकार दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हेच कारण दिले तर नीलम गोऱ्हे यांनी विदेश दौऱ्यावरून आल्याचे कारण दिले. नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे मराठी भाषा दालनाच्या उद्घाटनाला गैरहजर होते तर शनिवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीदेखील महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील ग्रंथ प्रदर्शनाला ऑनलाईन हजेरी लावली.