आरोग्य जागृतीसाठी शिक्षकांनी यावे पुढे
By admin | Published: June 14, 2014 11:07 PM2014-06-14T23:07:50+5:302014-06-15T00:28:26+5:30
अरुण जामकर : आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार; कृतिशील विद्यार्थ्यांना व्यासपीठ
नाशिक : सर्वसामान्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेऊन शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्याची माहिती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट दिली असता, या ठिकाणी त्यांना विद्यापीठाच्या वतीने आरोग्यविषयक जनप्रबोधनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ हेल्थ कम्युनिकेशन विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये आरोग्याविषयाची जागृती कशी निर्माण होऊ शकते, याविषयी जनप्रबोधनाचे काम विद्यापीठाच्या वतीने केले जाते. यासाठी विद्यापीठाअंतर्गत डिपार्टमेंट आॅफ हेल्थ कम्युनिकेशनची स्थापना करण्यात आली असल्याचेही डॉ. जामकर यांनी सांगितले.
संशोधनाबाबत विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्याबरोबरच त्यांना अनेक संधी उपलब्ध करून देणे शिक्षकांचे काम आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती शोधून कृतिशील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ दिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे समुपदेशक सुनील अहेर, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे, आयुष विभागाचे डॉ. प्रदीप आवळे आणि श्वेता तेलंग यांनी मार्गदर्शन केले. श्रीमता निर्मला अष्टपुत्रे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)