निफाड @ १.८, राज्यात नीचांकी तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 02:12 PM2018-12-27T14:12:47+5:302018-12-27T14:13:08+5:30
सायखेडा : कॅलिफोनिया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे गुरूवारी पहाटे राज्यातील सर्वात नीचांकी १.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
सायखेडा : कॅलिफोनिया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे गुरूवारी पहाटे राज्यातील सर्वात नीचांकी १.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे मात्र दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. ढगाळ वातावरण गेल्यानंतर पुन्हा थंडीने जोर धरला आहे. गोदावरी आणि कादवा नदीचे खोरे असल्याने पाणथळ परिसरात दवं मोठ्या प्रमाणात तयार होते. थंडीत वाढ झाल्याने ऊसाचे पाचट, झाडाचे पाने, शेतातील पिके, घराबाहेर लावलेली साधने यांच्यावर पडलेल्या दव गोठून बर्फ तयार झाला. सकाळी लवकर उठल्यानंतर बाहेर पडलेल्या नागरिकांना अनेक ठिकाणी बर्फ दिसला. अनेक ठिकाणी पाणी गोठले आहे. देशात काश्मीरची थंडी आणि बर्फ पहाण्यासाठी नागरिकांची पसंती असली तरी काश्मीरला जाण्याऐवजी निफाडला थंडीचा आस्वाद घ्यावा अशी साद सोशल मीडियावर घातली जात आहे. वाढत्या थंडीचा परिणाम द्राक्ष पिकावर होऊ लागला आहे. तालुक्यात सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते मात्र थंडी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. मन्यांना तडे जाणे, फुगवण थांबणे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणे, पाने पिवळी पडणे, वेलेची वाढ थांबणे, परिपक्व घडातील शूगर कमी होणे असे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. वार्षिक एकदाच उत्पन्न देणारे पीक असल्याने मोठा खर्च झाला आहे.